Sunday, August 10, 2008

'फोडा आणि झोडा'


मराठवाड्यातील अतिरेकी भारनियमनाविरुद्घ आम्ही गेल्या आठवड्यात समग्र विकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात छेडलेले आंदोलन बरेच गाजले. अकोल्याचा अपवाद वगळता इतर ठिकाणी आंदोलन शांततापूर्ण राहिले. बरयाच ठिकाणी वीज मंडळ अधिका:यांनीच आन्दोलनकर्त्यांची बाजू समजून घेऊन आणि त्यांचा सन्मान ठेवीत स्वत:च कार्यालयातील पंखे, ट्यूब लाईट्स, वातानुकूल यंत्रे काढून ठेवलीत, अथवा बंद ठेवली. अकोल्यात मात्र पोलिसांच्या नाहक दडपशाहीमुळे आंदोलनाला गालबोट लागले. वास्तविक आम्ही हे प्रतीकात्मक आंदोलन उभे केले ते सर्वसामान्य लोकांना वीज भारनियमनाचा होत असलेला असह्य त्रास शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी. आमच्यापैकी कुणाचाही त्यात कुठल्याही प्रकारचा वैयक्तिक स्वार्थ नव्हता. सामान्य लोकांना कुणी जुमानित नाहीत, त्यांचा आवाज ऐकल्या जात नाही, त्यांची दु:खे कुणी समजून घेत नाहीत, त्यामुळे ते केवळ निराशच होत नाही तर अन्यायाविरुद्घ लढण्याची ताकदही गमावून बसतात. अशा परिस्थितीत कुणीतरी त्यांच्यावातीने बोलणारा, लढणारा उभा होणे गरजेचे असते. त्यांच्या असंतोषाला दिशा देणारा, त्यांना योग्य वाट दाखविणारा कुणी तरी हवा असतो. सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून आम्ही ती भूमिका स्वीकारण्याचे ठरविले. सर्वसामान्य लोकांचा असंतोष सनदशीर मार्गाने शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही आंदोलनाचा एल्गार पुकारला. आमचे आंदोलन अहिंसक, तसेच प्रतीकात्मक होते आणि म्हणूनच अवघ्या जगाला शांततेचा, करुणेचा संदेश देणारया तथागत भगवान बुद्घांच्या; महात्मा गांधीजींच्या किंवा भगवान महावीरांच्या प्रतिमा किंवा मेणबत्त्या वा कंदील सोबत आणावेत, असे आवाहन मी दिनांक ३० जुलैच्या दै. देशोन्नतीमध्ये केले होते. त्यानुसार कुण्यातरी आंदोलकाने भगवान गौतम बुध्दाच्या काही मूर्ती आणून त्यातील एक माझे हातात भक्तिभावाने दिली. काहीही कारण नसताना, कुठलीही चिथावणी नसताना पोलिस अचानक लांडग्यासारखे आन्दोलनकर्त्यान्वर तुटून पडतील, याची पुसटशीही कल्पना आम्हाला नव्हती. असे काही होऊ शकते आणि त्यातून भगवान बुद्घांच्या प्रतिमांची विटंबना होऊ शकते, याची थोडी जरी कल्पना आम्हाला असती किंवा कुणी आमच्या ते लक्षात आणून दिले असते तर आम्ही त्या प्रतिमांचा वापर केलाच नसता. पोलिसांनी अचानक केलेल्या बेछूट लाठीमारामुळे गोंधळ उडाला. माझ्यावरही त्यांच्या लाठ्या चालल्या, परंतु एवढे होऊनही मी माझ्या हातातील भगवान बुद्घांची प्रतिमा शेवटपर्यंत सुरक्षित ठेवली, ती केवळ बौद्घ धर्मीयांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणूनच नाही तर माझ्याही भगवान बुद्घांांप्रतीच्या भावना तितक्याच संवेदनशील आहेत म्हणून. भगवान बुद्घी केवळ बौद्घ धर्मींयांसाठीच नव्हे तर अखिल विश्वासाठी वंदनीय आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेच्या विटंबनेतून केवळ बौद्घ धर्मीयांच्या भावना दुखावल्या जाणार नव्हत्या तर माझ्याही भावना दुखावल्या जाणार होत्या. आणि तसे काही होऊ नये म्हणून आम्ही शक्य तेवढी काळजी घेतली; परंतु पोलिसांच्या आकस्मिक बेछूट लाठीमाराने काही अनुचित घडलेच आणि त्याचा आम्हाला प्रचंड खेद आहे. परंतु त्यानंतर या अपघाताचे 'याप्रकारे भांडवल करण्यात आले, ते निश्चितच खेदजनक होते. आमच्या काही हितशत्रूंनी नसलेली आग निर्माण करून त्यात तेल ओतण्याचे काम केले. या सर्व प्रकारात पोलिसांची भूमिकाही अतिशय संशयास्पद होती. हा सगळा प्रकार पाहून एकप्रकारची उद्विग्नता मनात आली. विजेच्या भारनियमनाचा थोडाही चटका मला सहन करावा लागत नसताना केवळ सामान्य लोकांसाठी रस्त्यावर उतरून पोलिसांच्या लाठ्यांचा मार खाण्याची काय गरज होती, असा प्रश्न मला पडू लागला. ज्या लोकांसाठी मी धाडस केले तेच लोक माझ्या निषेधाच्या घोषणा देत असतील तर यापुढे इतर पत्रकछाप पुढा:यांसारखा `एसी' केबिनमध्ये बसून आंदोलन चालविणे काय वाईट, असाही विचार मनात येत आहे. ज्या प्रश्नावर लोकांनी रस्त्यावर उतरायला हवे, त्या प्रश्नावर ते शांत राहतात, परंतु ज्या प्रश्नांचा त्यांच्या दैनंदिन सुख-दु:खाशी काडीचाही संबंध नाही त्या प्रश्नावर मात्र चवताळून उठतात, ही परिस्थिती सर्वसामान्यांच्या सर्वसामान्य प्रश्नावर आंदोलन करू पाहणा:याच्या दृष्टीने निराशाजनकच म्हणावी लागेल. प्रचलित वाटेवरून मान खाली घालून चालणे हा सर्वसामान्य मनुष्याचा स्वभाव असतो. त्यात एकप्रकारची सुरक्षितता असते. ही वाट आपल्याला कुठे घेऊन जाईल किंवा आपण योग्य दिशेने चालत आहोत की नाही याची काळजी नसते. जे अनेकांचे झाले तेच आपले होईल, या भावनिक आधाराचे संरक्षक कवच घेऊन चालणा:यांची संख्या खूप मोठी आहे आणि म्हणूनच कुणी वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न केला तर त्याला सुरुवातीला विरोधच सहन करावा लागतो. कारण अनेकांचा हा मुळातच तकलादू असलेला भावनिक आधार तो मुळापासून हादरवत असतो. हा हादरा सहन करण्याची ताकद खूप कमी लोकांमध्ये असते. त्यामुळे वेगळ्या वाटेने जाणा:याच्या वाटेवर बहुधा काटेच पेरलेले असतात. हा नियमच आहे आणि इतिहास याला साक्षी आहे. मुलींना शिक्षित करण्याची वेगळी वाट चोखाळणारया सावित्रीबाईंना अंगावर शेण झेलीतच पुढे जावे लागले. महात्मा ज्योतिबा फुल्यांनाही काही वेगळा अनुभव आला नाही. अन्याय करणा:याइतकाच अन्याय सहन करणाराही दोषी आहे, हा विचार देणा:या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तर जीवनाच्या अंतापर्यंत केवळ संघर्षच करावा लागला. महात्मा गांधींना तर आपल्या प्राणांचेच मोल द्यावे लागले. हे केवळ आपल्या देशातच घडले किंवा घडते असे नाही. अमेरिकेत मार्टिन ल्यूथर किंगची हत्या करण्यात आली. नेल्सन मंडेलांना अर्धेअधिक आयुष्य तुरुंगात काढावे लागले. उदाहरणे तशी खूप देता येतील आणि ही सगळीच उदाहरणे हेच सत्य प्रतिपादित करतात की ज्या कोणी वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न केला, ज्या कोणी वेगळी वाट चोखाळण्याचा, प्रस्थापितांविरुद्घ लढण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना आपले आयुष्य पणाला लावावे लागले. कारण एकच, या सगळ्यांचा संघर्ष समाजातील दुर्बल घटकांच्या शोषणातून मत्त झालेल्या प्रस्थापित वर्चस्ववाद्यांच्या साम्राज्याला आव्हान देणारा होता. ज्यांचे संघर्ष यशस्वी झाले त्यांचे नाव इतिहासात कोरल्या गेले, परंतु हे भाग्य संघर्ष करणा:या सगळ्यांनाच लाभले असे नाही. अनेकांना त्यांच्या संघर्षासह कायमचे शांत करण्यात मूठभर वर्चस्ववादी यशस्वी ठरले. सत्ता आणि सैन्यावर पकड असलेल्या या वर्चस्ववाद्यांशी संघर्ष करून पीडितांना न्याय मिळवून देण्याची धडपड कोणत्याच युगात साधी गोष्ट नव्हती आणि तशी ती आजही नाही. आजच्या काळात हुकूमशाही शासनप्रणाली फारशी कुठे दिसत नसली तरी हुकूमशाही मनोवृत्ती मात्र कायम आहे. मुखवटा बदलून वावरणारे चेहरे जुनेच आहेत. आपल्या वर्चस्वाला किंवा साम्राज्याला आव्हान देणा:याला संपविण्याचे कूट कारस्थान तसेच सुरू आहे. पद्घती बदलल्या असतील, साधने बदलली असतील तरी हेतू मात्र तोच आहे. ब्रिटिशांनी दीडशे वर्षे इथे राज्य केले ते केवळ फुटीरतेचे कुटिल राजकारण करून. त्यांनी या देशाचा समाज एकसंघ होऊ दिला नाही. 'फोडा आणि झोडा' हा त्यांचा यशस्वी मूलमंत्र होता आणि इथून जाताना त्यांनी या मूलमंत्राची दीक्षा इथल्या सत्ताधा:यांना दिली. त्याच तंत्राचा वापर करीत अन्यायाविरुद्घ, शोषणाविरुद्घ आवाज उठविणा:यांचा आवाज आसमंतात घुमण्यापूर्वीच मुका करण्याची खेळी आमचे सरकार करीत असते. त्यासाठी विविध जाती-धर्मांमधील दरी प्रयत्नपूर्वक कायम ठेवली जाते. वर्चस्ववाद्यांच्या हाती असलेले हे एक अमोघ अस्त्र आहे. संघर्ष करणा:याची जात, त्याचा धर्म पाहायचा आणि ती डोकेदुखी कायमची दूर करण्यासाठी इतर जातींना, धर्मांना त्याच्याविरुद्घ भडकवायचे, हा अगदी रामबाण ठरणारा उपाय सत्ताधीश चोखाळत असतात. पाहुण्यांच्या काठीने साप मारण्याची ही कला सत्ताधारी वर्ग इतक्या बेमालूमपणे वापरतो की या कारस्थानामागे दुसरेच कुणी आहे, याची साधी शंकाही कुणाला येत नाही. सत्ताधा:यांच्या या कुटिल राजकारणात आजवर अनेकांचा बळी गेला आहे, पुढेही अनेकांचा जाईल, परंतु न्यायाची ताकद आणि संघर्षाची जिद्द जगातल्या कोणत्याही सत्ताधीशांपेक्षा नेहमीच मोठी ठरत आली आहे आणि या सत्यालाही इतिहास साक्षी आहे. फ़क्त गरज आहे ती संघर्षाचा यज्ञकुंड सतत धगधगता ठेवण्याची आणि ही जबाबदारी समाजाची आहे. समाजच नेत्यांना घडवित असतो. समाजाच्या मानसिक अवस्थेचे, त्याच्या सुदृढतेचे अथवा दुर्बलतेचे प्रतिबिंब तो समाज कशाप्रकारचे नेतृत्व उभे करतो किंवा घडवतो, यातून स्पष्ट होत असते. लोकांना लढणारे नेते चालत नसतील, त्यांच्या ख'चीकरणाचा प्रयत्न होत असेल तर याचा अर्थ समाजाची लढण्याची उमेदच नष्ट झाली आहे, असाच होतो. ही उमेद नष्ट होऊन चालणार नाही, तूर्तास एवढेच!

No comments:

Post a Comment