Sunday, May 3, 2009

आजकाल सगळीकडे `ग्लोबल वार्मिंगची' चर्चा होत असते.

आजकाल सगळीकडे `ग्लोबल वार्मिंग'ची चर्चा होत असते. या वर्षीच्या उन्हाच्या तडाख्याने तर या चर्चेला थोडी अधिकच धार चढली आहे. `ग्लोबल वार्मिंग'चा प्रश्न नक्कीच गंभीर आहे; परंतु हे `ग्लोबल वार्मिंग' केवळ भूगोलाशी किंवा पृथ्वीच्या तापमानाशी संबंधित नाही. या `ग्लोबल वार्मिंग'ला इतरही अनेक आयाम आहेत. प्रदूषण ही केवळ भौतिक बाब राहिलेली नाही. प्रदूषण आता सामाजिक, शारीरिक आणि मानसिक पातळीवरही मोठ्या प्रमाणात धुडगूस घालत आहे. धोका केवळ पर्यावरणालाच नाही, तर मानवी सभ्यतेलाही निर्माण झाला आहे. थोडे बारकाईने निरीक्षण केले तर आपल्याला दिसून येईल की अलीकडील काळात वैयक्तिक आणि कौटुंबिक हिंसाचारात खूप वाढ झालेली आहे. हिंसाचार पूर्वीही होता; परंतु बहुधा तो लढाई वगैरेच्या माध्यमातून व्हायचा. देशाच्या किंवा धर्माच्या रक्षणासाठी माणसे तलवार हाती घ्यायची. आता लढाया वगैरे फारशा होत नसल्या तरी माणसे तितकीच मारली जातात, रक्त तितकेच सांडते आणि याला कारण आहे ती दिवसेंदिवस क्रूर, हिंसक बनत चाललेली मानवी वृत्ती. ही वृत्ती आता अधिकाधिक बळावत चालली आहे. माणसांमधला सोशिकपणा, साहचर्याची भावना, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती हळूहळू लोप पावत चालली आहे. कोणाचे डोके केव्हा भडकेल आणि कोण कुणाचा मुडदा पाडेल सांगता येत नाही. भावांना भाऊ, सासवांना सुना, सुनांना सासवा, पोरांना आपले म्हातारे आई-बाप शत्रूसारखे वाटायला लागले आहेत. लोकांच्या वृत्तीत होत असलेला हा बदल स्वाभाविक प्रक्रियेचा भाग नाही. हा बदल घडवून आणल्या जात आहे किंवा हा बदल घडण्याजोगी परिस्थिती निर्माण केली जात आहे. आपण जसा आहार घेतो तसे आपले शरीर बनते, तसेच आपल्यासमोर जे विचार मांडले जातात त्यानुसार आपली मनोवृत्ती घडत जाते. सकारात्मक विचार असतील तर परिणाम सकारात्मकच मिळतील. साधे उदाहरण आहे, एखादा लहान मुलगा कप-बशी घेऊन जात असेल आणि आपण त्याला म्हटले की पहा फोडशील, तर नक्कीच ती कप-बशी फुटणार. एरवी ती त्याने व्यवस्थित नेली असती, परंतु आपल्या हाताने ती फुटू शकते, हा नकारार्थी विचार त्याच्या मनात शिरताच नकारार्थी प्रेरणा मिळून तसा परिणाम होतो. त्याऐवजी त्याला केवळ सांभाळून ने एवढे म्हटले तरी तो ती तशीच व्यवस्थित घेऊन जाईल. सकारात्मक विचारांचे महत्त्व खूप आहे. विजेचा दिवा शोधून काढणारया एडिसनला हा शोध यशस्वी करण्यासाठी हजारवेळा प्रयत्न करावे लागले होते. हजाराव्या प्रयत्नात तो शेवटी यशस्वी ठरला आणि त्यासाठी आपण एक दिवस यशस्वी होऊच हा सकारात्मक विचारच कारणीभूत ठरला. मी हे करू शकणार नाही, मला हे जमणार नाही, हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे, असा विचार करणारा माणूस कधीच यशस्वी होऊ शकत नाही. एक गोष्ट समजून घ्यायला हवी की प्रत्येक प्रयत्न यशस्वी होत नसला तरी यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे अनिवार्य आहे. मी स्वत: नेहमीच सकारात्मक विचार करतो आणि आज मी जे काही आहे ते या विचारांच्या ऊर्जेमुळेच. सांगायचे तात्पर्य सुदृढ, निकोप आणि यशस्वी आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक आणि चांगले विचार आपल्यापर्यंत पोहोचणे गरजेचे असते. दुर्दैवाने आज जे विचार विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचविले जात आहेत ते कमालीचे नकारात्मक आणि विषाक्त आहेत. या वैचारिक प्रदूषणासाठी सर्वाधिक जबाबदार आहे तो `इडियट बॉक्स' अर्थात छोटा पडदा! या छोट्या पडद्यामुळे आपले सामाजिक स्वास्थ्यच धोक्यात आले आहे. एकतर आजकाल माणसाचे जगणे खूप धावपळीचे झाले आहे. विरंगुळ्यासाठी त्याच्याजवळ फारसा वेळ नसतो. पूर्वी थोडा निवांतपणा असायचा. त्यामुळे चांगल्या पुस्तकाचे, ग्रंथाचे वाचन व्हायचे. त्यातून चांगले विचार मिळायचे. आता या छोट्या पडद्याच्या अतिक्रमणाने तर वाचन संस्कृतीच नष्ट होऊ घातली आहे. विरंगुळ्याचे चार क्षण टीव्हीसमोर बसून घालविणारया माणसाच्या डोक्याचे पार खोबरे करण्याचे काम या टीव्हीवरच्या मालिका करीत आहेत. विशेषत: तुलनेत अधिक वेळ टीव्हीसमोर घालविणारया महिलांचा बुद्घिभेद करण्याचे काम इमानेइतबारे हा छोटा पडदा करीत आहे. अशी एकही मालिका नसेल की ज्यात कट-कारस्थाने, हिंसा, एकमेकांचा द्वेष, विवाहबाह्य संबंध आदींची रेलचेल नसेल. शिवाय हे इतक्या प्रभावीपणे दाखविले जाते की त्यात काही गैर आहे, असेही हे पाहणारया लोकांना विशेषत: महिलांना वाटत नाही. त्या मालिकांमधील पात्रांपैकी एखाद्या पात्रात स्वत:ला शोधत त्या मालिकांशी समरस होणारया महिला वर्गाला आपण कोणते वैचारिक विष आपल्या डोक्यात ओतून घेत आहोत, याची कल्पनाही नसते. हे सगळे पात्र त्यांच्यासमोर आदर्श म्हणून उभे केले जातात. हे असे वैचारिक भरण असेल तर त्यातून सकारात्मक विचार निर्माण होतील तरी कसे? सासूला अनाथाश्रमाचा रस्ता दाखविणारी पडद्यावरची सून आदर्श वाटत असेल तर घरात तोच `सिन' दाट शक्यता असते. उरलीसुरली कसर भूताखेताच्या , पुनर्जन्मावर वगैरे आधारित मालिका भरून काढतात. हे असे भयंकर पोषण होत असेल तर त्या मेंदूत सकारात्मक आणि शुद्घ विचारांना जागा उरतेच कुठे? त्यातही आपले `टीआरपी' टिकवून ठेवण्यासाठी कथेला अनेक अतर्क्य वळणे दिली जातात. मेलेला माणूस पुन्हा जिवंत करणे किंवा पुनर्जन्म दाखवून तोच माणूस पुन्हा उभा करणे दिग्दर्शकाच्या डाव्या हातचा मळ असतो. हा पनाही अतर्क्यपनाही सहज खपवून घेतला जातो. आज छोट्या पडद्याने बहुतेकांचे भावविश्व व्यापून टाकले आहे, ही वस्तुस्थिती स्वीकारली तर हा छोटा पडदा करत असलेले वैचारिक प्रदूषण ही किती गंभीर समस्या आहे, याची कल्पना येऊ शकते. हा केवळ मनोरंजनाचा भाग नाही. या विविध वाहिन्या आणि त्यांनी पोसलेले कार्यक्रम निर्माते, दिग्दर्शक केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी हे सगळे करत नसून त्यामागे एक मोठे षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या देशाची कुटुंबव्यवस्था, त्यातून होणारे संस्कार, त्या संस्कारातून निर्माण झालेली सामाजिक वीण उद्ध्वस्त करण्याचा हा कट असू शकतो. प्रत्येक मालिकेत जाणीवपूर्वक ज्या एरवी आपल्या कुटुंबात घडत नाहीत त्या गोष्टी ठासून आणि त्याला तात्त्विकतेचा मुलामा देऊन दाखविण्यात येतात. महिला वर्ग आणि तरुण पिढीवर तशा गोष्टींचा चटकन परिणाम होतो. आजकाल समाजात स्वैर आणि स्वछन्दपना वाढीस लागलेला दिसतो तो याचमुळे. कुटुंबात कलह निर्माण होण्यामागेही हेच वैचारिक विष कारणीभूत ठरत आहे. या प्रदूषणाला वेळीच आळा घालणे भाग आहे. युरोपमधल्या काही देशात टीव्ही न पाहण्याची चळवळच सुरू झाली आहे. अनेक संघटना लोकांना टीव्हीपासून दूर राहण्याचा संदेश देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रबोधन करीत आहे . `से नो टू इडियट बॉक्स' असेच त्या चळवळीचे नाव आहे. आपल्याकडेही अशा प्रबोधनाची गरज आता निर्माण होऊ पाहत आहे. टीव्ही असो अथवा चित्रपट असो, या दोन्ही माध्यमातून नकारात्मक विचारांचा भडिमार सुरू असतो. `मी शिवाजी राजे भोसले बोलतोय'सारखा एखादाच चित्रपट त्याला अपवाद ठरावा, एरवी बाकी सगळ्या चित्रपटांनी आणि छोट्या पडद्यावरील मालिकांनी त्यांच्या दर्शकांना अंतर्बाह्य पोखरण्याचेच पत घेतले आहे. मी अनेक वैद्यकीय त'ज्ञांशी याबाबतीत बोललो आहे आणि त्या सगळ्यांचेच म्हणणे असे होते की मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयरोगसारख्या विकारांचा थेट संबंध माणसाच्या मन:स्थितीशी असतो. एखादी व्यक्ती सकारात्मक विचार करीत आनंदाने जगत असेल तर त्या व्यक्तीला हे विकार होण्याची शक्यता जवळपास शून्य असते; परंतु एखादी व्यक्ती नेहमीच नकारात्मक आणि हिंसक विचार करीत असेल तर त्या व्यक्तीची या विकारांपासून सुटका नाही. हे वैद्यकीय सत्य असेल तर अर्धा देश हृदयरोगी किंवा रक्तदाबाचा रुग्ण करण्याचे पुण्यकार्य छोटा आणि मोठा पडदा करीत आहे, असेच म्हणावे लागेल. लोकांच्या हातात `रिमोट' असतो, त्यांनी काय पाहायचे ते स्वत: ठरवावे असा एक तर्क नेहमीच दिला जातो; परंतु काहीही पाहिले तरी तेच दिसत असेल तर काय करायचे? आधी चटक लावायची, नंतर त्याचे व्यसन झाले की मग आम्ही थोडीच तुम्हाला हे पाहण्याचा आग्रह करतो अशी शहाजोगपणाची भूमिका घ्यायची, असा सगळा प्रकार आहे. जे चहाच्या बाबतीत झाले, जे क्रिकेटच्या बाबतीत झाले तेच आता या मालिका आणि चित्रपटांच्या बाबतीत झाले आहे. सरकार आणि समाजाने यावर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे, एवढे नक्की!