Sunday, August 3, 2008

कसेल त्याची समृध्दी!


कष्टाला पर्याय नाही, हे एक वैश्विक सत्य आहे. मनुष्यप्राणी आदिम काळात राहत होता तेव्हाही आणि आजच्या आधुनिक युगातही हे सत्य तसेच कायम आहे. त्याकाळीदेखील कष्टाशिवाय पोट भरत नसे आणि आताही ज्यांची कष्टाची तयारी नाही त्यांना भिकेला लागावे लागते. परंतु, मानवी मूल्यांच्या संदर्भात झपाट्याने बदलत चाललेल्या या जगात कष्टालादेखील `शॉर्टकट' शोधणे सुरू झाले आहे. काहीही न करता कुठून काही मिळेल का, याचा सातत्याने शोध घेतला जातो. सट्टा, जुगार, मटका, शेअर्सची दलाली, लॉटरी यांचे सध्या जे पेव फुटले आहे ते मानवी वृत्तीच्या या बदलत्या कलांमुळेच. अनेकांचे आयुष्य या मृगजळाच्या मागे धावण्यातच बरबाद होतात, तर अनेकांची समृद्घी याच कारणाने भिकेला लागते. कष्टाला यश येणे न येणे हा वेगळा भाग आहे. प्रत्येकाच्या कष्टाला समृद्घीची फळे लागतीलच असे नाही. परंतु, कष्टाला फळ येत नाही म्हणून कष्ट करणेच सोडून देणे म्हणजे दूध देत नाही म्हणून गाय विकून टाकण्यासारखे आहे. गाय दारात असते तोपर्यंत दूध मिळण्याची शक्यता काहीअंशी तरी कायम असते, परंतु गाय विकताच ती संपूर्ण शक्यताच संपुष्टात येते. सांगायचे तात्पर्य, यश मिळो अथवा ना मिळो कष्टाला पर्याय नसतो, कष्ट करावीच लागतात. शारीरिक असो, मानसिक असो अथवा बौद्घिक असो, आपल्या वाट्याला येणारे कष्ट केल्याशिवाय समृद्घीचा स्वर्ग दिसणे शक्यच नाही. कष्ट करणे ही एक वृत्ती आहे, प्रवृत्ती आहे. ती सगळ्यांमध्येच असते असे नाही आणि ज्यान्च्यात ती नसते त्यांची आयुष्ये कालांतराने भकास झाल्याशिवाय राहत नाही. मी भरपूर प्रवास करतो. प्रवासात माणसे वाचण्याचा मला छंदच लागला आहे. राज्याच्या, देशाच्या वेगवेगळ्या भागात प्रवास करताना मला मानवीवृत्तीच्या विविध छटा पाहायला मिळतात. घरी भरपूर श्रीमंती असूनही शेताच्या मातीत राबणारे, शेती-वाडीवरच राहणारे, साध्या धोतर-कुत्र्यात वावरणारे आणि पैशा-पैशाचा चोख हिशेब ठेवणारे शेतकरी जसे मला प. महाराष्ट्रात पाहायला मिळाले तसेच शेतीत काय पडले आहे, असे निराशोद्गार काढीत शेती-वाडी विकून शहरातल्या कुठल्यातरी खोपट्यात आश्रय घेणारे बडे शेतकरी विदर्भात पाहायला मिळाले. विदर्भातले अनेक शेतकरी, ज्यांच्याकडे बर्यापैकी जमीन आहे, आपल्या शेती-वाडीवर राहतच नाही. कुठेतरी शहरात, तालुक्यात राहून येऊन-जाऊन शेती करणार्यांची संख्या विदर्भात खूप मोठी आहे. गडी-माणसांच्या भरवशावर शेती करणारया आणि वरून शेतीत काही पडले नाही, अशी मल्लीनाथी करणारया या शेतकर्यान्ना शेतीच्या मातीत कुठले परीस दडले आहे, ते कळतच नाही. तुलनेने विपरीत परिस्थिती असूनही पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आज समृद्घ दिसत असेल तर ते एवढ्याचसाठी की शेतीच्या मातीशी जुळलेली आपली नाळ त्याने कधी तुटू दिली नाही. राजकारणात मोठमोठ्या पदापर्यंत, अगदी मंत्रिपदापर्यंत पोहोचलेले लोकही आजही आपल्या शेतीची तितक्याच आस्थेने काळजी घेताना दिसतात. गावी असले की शेतावर त्यांची एक चक्कर हमखास असतेच. बहुतेकांची शेतावरदेखील घरे आहेत आणि गावात असताना त्यांचा मुक्काम बहुतेक वेळा या शेतावरच्या घरातच, तात्पर्याने शेतातच असतो. विजयसिंह मोहिते पाटील, बबनराव पाचपुते, शंकरराव कोल्हे, प्रतापराव भोसले या नावांचा नव्याने परिचय करून देण्याची गरज नाही. या सगळ्या लोकांचे राजकारणाइतकेच त्यांच्या शेतीवरही प्रेम आहे आणि राजकारणाइतकाच वेळ ते त्यांच्या शेतीला देतात. मातीवरचे हे असे निस्सीम प्रेम विदर्भात अभावानेच आढळून येते. अर्थात त्यामागे इतरही अनेक कारणे आहेत. विदर्भ-मराठवाड्यातील बहुतांश खेड्यांमध्ये दवाखाने, रस्ते, शाळा अशा प्राथमिक सुविधाही उपलब्ध नाहीत. शेतक:यांच्या मालाचे चांगल्याप्रकारे `मार्केटिंग' करण्याच्या सोयी नाहीत. उत्पादन खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसविण्याचे कसब या शेतक:यांमध्ये नाही. एकाधिकार योजनेने या शेतक:यांमधील व्यावहारिक कौशल्येच संपुष्टात आली. त्यामुळे बाजारभाव, बाजारातील चढ-उतार, कोणत्या पिकाला केव्हा, किती मागणी असेल याचा अंदाज घेणे, माल बाजारात केव्हा आणणे वगैरे गोष्टी या शेतक:यांना कळेनाशा झाल्या. पीक काढायचे आणि बाजार समितीत नेऊन टाकायचे. ते देतील तेवढ्याचा धनादेश घेऊन मुकाट्याने परतायचे. या पलीकडे फारसा विचार इकडचे शेतकरी करतच नव्हते. पिकांमध्ये बदल करणे, पीक पद्घतीत बदल करणे, नगदीच्या इतर पिकांचा विचार करणे, उत्पादक आणि विक्रेता या दोन्ही भूमिका स्वत: करून पाहण्याचा प्रयत्न करणे, यावर कधी विचारच झाला नाही. शेवटी कष्ट म्हणजे केवळ ढोर मेहनत नसते. कष्टाच्या व्याख्येत मेहनतीच्या जोडीला बुद्घीची, कल्पकतेची जोड असतेच. या व अशाच इतर अनेक कारणांमुळे विदर्भातली शेती आणि शेतकरी कफल्लक झाला. चार पैसे अधिक कमवायचे म्हटले तर शहराची वाट धरण्याशिवाय दुसरा पर्याय त्याच्याकडे उरला नाही. त्यातच शेती सातत्याने तोट्यात जात असल्याने शेतक:यांची मुले आता शेती-वाडी विकून शहरात कुठेतरी एखादी नोकरी मिळवून स्थिर आणि शांत आयुष्य जगण्याचा सुरक्षित पर्याय शोधत आहेत. परंतु, कष्ट करण्याची मानसिकता नसणे हा पैलूही आहे. कष्ट करायची तयारी असेल, योग्य नियोजन करता येत असेल आणि कुटुंबातील सगळ्यांचाच शेतीला हातभार लागत असेल तर शेती, मग ती कुठलीही असो आजही फायद्याची ठरू शकते. शेती हा एकट्या माणसाचा उद्योग नाहीच. पूर्वी एकत्र कुटुंब पद्घती होती. त्यामुळे शेतीचा भार एकट्यावर पडायचा नाही. वेगवेगळी कामे घरातील माणसे वाटून घ्यायचेत. घरातील स्त्रियांचीही शेती कामात मोठी मदत व्हायची. त्यामुळेही शेती फायद्यात राहायची. शेती स्वत: कसली, स्वत: देखभाल केली तर शेतीतून फायदा होतोच. प. महाराष्ट्रातील शेतक:यांनी हे दाखवून दिले आहे. तिकडच्या शेतक:यांचे आपल्या शेतीकडे जातीने लक्ष असते. करोडोच्या इस्टेटीचा मालक असला तरी तिकडचा शेतकरी आपल्या मजुरांसोबत शेतीत स्वत: राबतो. शेतीत जे काही पिकेल ते रस्त्यावर बसून विकायला त्याला लाज वाटत नाही. त्या भागातून जाणा:या राष्ट्रीय किंवा राज्य मार्गावर ठिकठिकाणी अशी छोटी-छोटी तात्पुरता आडोसा करून उभी असलेली असंख्य दुकाने दिसतील. तालुक्याच्या गावात राहून खेड्यावरची शेती सांभाळण्याचा प्रकार तिकडे दिसत नाही. स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, हेच तिकडचे तत्त्वज्ञान आहे. कधीकाळी आपल्याकडेही हेच तत्त्वज्ञान होते. परंतु, कमालीची सुपिकता, भरघोस उत्पन्न आणि त्यासोबत नकळत येणारे अतिरेकी औदार्य इकडच्या `जमीन'दारांना भूदास आणि पुढे उदास करून गेले. खेड्यातल्या हिरव्यागार सौंदर्यापेक्षा शहराचा कृत्रिम झगमगाट लोकांना अधिक आवडू लागला. निसर्गाशी जुगार खेळून निसर्गावर मात करण्याची हिंमत इकडचा शेतकरी हरवून बसला, त्यामुळे दोन-चार हजाराच्या सुरक्षित नोक:यांचे त्याला अधिक आकर्षण वाटू लागले. शेतक:यांची मुले आता शेतीत रमायला तयार नाहीत. शेतीचा विचार शेवटचा पर्याय म्हणून केला जातो. तोही फसला तर आत्महत्या आहेच. एकाचे हजार दाणे देणारी ही काळी आई असा आपल्याच लेकरांचा जीव घेणार नाही. गरज आहे ती फ़क्त तिला थोडी माया लावण्याची, तिच्यासाठी राबण्याची, थोडी कल्पकता दाखविण्याची आणि अर्थातच रसायनांच्या विषारी विळख्यातून या काळ्या आईला बाहेर काढण्याची.

No comments:

Post a Comment