Sunday, April 27, 2008
अत्र तत्र सर्वत्र
रामायणातील एक गोष्ट सर्वविदित आहे. वाटमारी करून लोकांना त्रस्त करणारया वाल्याला तुझ्या या कामाला तुझ्या कुटुंबीयांचे समर्थन आहे का, तुझ्या पापात ते वाटेकरी आहेत का, असे नारदाने विचारले. वाल्याने आपल्या कुतुन्बीयान्ना यासंदर्भात विचारले असता त्याच्या पापात आपण सहभागी नसल्याचे त्यांनी सांगितले. तो सतयुगाचा काळ होता. अपराधी अपवादात्मक होते आणि अपराध अपवाद होता. आता कलियुग आहे. आता वाल्या वेगळा आणि त्याचे कुटुंबीय वेगळे असा प्रकारच राहिला नाही. प्रत्येकालाच वाल्या व्हायचे असते. जमेल तसा जमेल त्या मार्गाने पैसा लुबाडायचा असतो. तेव्हा वाल्याच्या हातात कु:हाड होती, आता बदलत्या काळाशी सुसंगत असे भ्रष्टाचाराचे शस्त्र हाती घेतले जाते. आपल्याकडे भ्रष्टाचार म्हटले की साधारण राजकारणी लोक आणि सरकारी अधिका:यांचीच चर्चा होते. त्यांचा भ्रष्टाचार दिसून पडतो किंवा उजळमाथ्याने होतो म्हणून कदाचित असेल; परंतु भ्रष्टाचारी कोण नाही? आपण नेहमीच जगाचा न्याय करताना स्वत:चा अपवाद करून बोलत असतो. मी एक चांगला बाकी सगळेच हरामखोर अशी आपली भूमिका असते आणि असा विचार प्रत्येक जण करीत असतो, हे विशेष. कुणालाही विचारा, हा जो भ्रष्टाचार तुम्ही करीत आहात त्याचे तुम्हाला काहीच वाटत नाही का? उत्तर हेच येईल की, माझी तशी इच्छा नाही, परंतु नाईलाज आहे. साहेबाला पैसे द्यावे लागतात म्हणून बाबू पैसे खातो, साहेब त्याच्या वरच्या साहेबाचा 'कोटा' पूर्ण करीत असतो आणि या प्रवासात सगळेच आपापला वाटा काढून घेत असतात. मी गळ्यावर सुरी फिरवली नाही तर दुसरा कुणी फिरवील, मग मीच ते काम का करू नये, अशीच बहुतेकांची भूमिका असते आणि या चक्रातून कोणीही सुटत नाही. ज्याला जशी शक्य असेल तशी लूटमार सुरू असते. सर्वाधिक खेदाची बाब ही आहे की आपला हा आचार भ्रष्ट आहे याचा किंचितही खेद कुणालाही नसतो. अशा परिस्थितीत कुणी कुणाकडे बोट दाखवावे हा प्रश्नच आहे. सरकारी कार्यालयातला भ्रष्टाचार सर्वपरिचित आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तो पसरला आहे. परंतु 'गल्ली ते दिल्ली' हा केवळ स्थलदर्शक उल्लेख नाही तर, ती भ्रष्टाचाराचे सर्वव्यापित्व दर्शविणारी एक संज्ञा आहे. शब्दश: बोलायचे तर गल्लीत हिंडून भंगार विकत घेणारया साध्या भंगारवाल्यापासून तर दिल्लीत सत्तेच्या खुर्चीवर बसून हजारो कोटींचे आंतरराष्ट्रीय सौदे करणा:यांपर्यंत सर्वत्र भ्रष्टाचार सुखेनैव नांदतो आहे. मोजून ठेवलेल्या रद्दीचा आणि भंगारवाल्याने मोजलेल्या रद्दीचा भाव वेगवेगळा असतो. तुम्ही तुमच्याकदाची रद्दी अगदी इलेक्ट्रॉनिक तराजूवर मोजून आणलेली असली तरी भंगारवाल्याच्या तराजूत ती दोन-पाच किलोने कमीच भरणार. तुम्हाला जो भाव सांगितला जातो तो भंगारवाल्याच्या तराजूने होणारया मोजमापाचा. तुम्ही अन्य तराजूवर मोजण्याचा आग्रह धरलाच तर रद्दीचा भाव बदलतो. हा अनुभव सर्वसामान्यांसाठी आणि त्यातही विशेषत: गृहिणींसाठी नेहमीचाच असतो. परंतु ही बनवेगिरी इथेच संपत नाही. केरोसिन विक्रेत्याला एका लिटरचे पैसे देऊन आपण लिटरभर रॉकेल आणले असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही प्रचंड भ्रमात आहात, असेच म्हणावे लागेल. त्याचे रॉकेल मोजण्याचे पात्र पूर्णपणे कधीच भरत नाही. ड्रमच्या तोटीतून वेगाने पडणारया धारेमुळे निर्माण होणारा फेस तुम्हाला लिटरमागे किमान पन्नास ते शंभर मिलीलिटरचा फटका देऊन जातो. म्हणजे तुम्ही पैसे मोजले असता ते एक लिटरचे आणि तुम्हाला केरोसिन मिळते नऊशे मिलीलिटर. एका लिटरमागे होणारा हा भ्रष्टाचार हजारो लिटरच्या व्यवहारात कुठपर्यंत पोहचत असेल, याची कल्पना आपण करू शकतो. या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मध्यंतरी बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील तहसीलदाराने केरोसिन विक्रेत्यांनी ग्राहकांना रितसर पावती द्यावी, केरोसिन दुधाच्या मापाने आणि तेही भांड्यात माप बुडवून द्यावे असा आदेशच काढला होता. एक लिटर दूध आणि एक लिटर रॉकेल यांचे आकारमान सारखेच असेल तर माप वेगळे कशाला, हा तर्कशुद्घ युक्तिवाद त्यामागे होता. या आदेशाचे पुढे काय झाले ते माहीत नाही, परंतु दुधाच्या मापाने केरोसिन विकण्याचा आदेश जारी करणारे राज्यातील पहिले तहसीलदार म्हणून नक्कीच त्यांचे नाव नोंदल्या गेले असेल. मोजमापातील या सर्रास चालणारया भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा बळी ठरतो तो शेतकरी. थेट भंगारवाल्यासारख्या हिशेबाने शेतक:यांच्या मालाचे वजन घरी जेवढे भरते तेवढे बाजारपेठेत आणल्यावर भरत नाही. `घट्टी'च्या नावाखाली सर्रास प्रतिक्विंटल काही किलो वजन कमी केल्या जाते. मालाच्या साठवणुकीचा किंवा विक्रीचा अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने शेतकरी हा `घट्टी'चा दणका मुकाटपणे सहन करतात. शेतक:यांचा कापूस जिनिंग-प्रेसिंगमध्ये आला की त्याचे वजन `धरम काटा'द्वारे केल्या जाते. मोठ्या प्रमाणात वजन करायचे असेल तर हा धरम काटा वापरला जातो. या धरम काट्यात आधीच ५० ते ८० किलोची हेराफेरी करून ठेवलेली असते. सरळ शब्दात सांगायचे तर सर्वसाधारण मोजमापात एखाद्या शेतक:याचा कापूस दहा क्विंटल (एक हजार किलो) भरत असेल तर तेवढाच कापूस धरम काट्यात ९५० किंवा ९२० किलो भरतो. या हिशेबाने साधारण पंधरा क्विंटलमागे एक क्विंटल कापूस लुटल्या जातो असे म्हणायला हरकत नाही. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार सगळ्यांना माहीत असतो; परंतु शेतकर्यान्चाही नाईलाज असतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment