Sunday, May 4, 2008

तेरवी गोडजेवन बंद करा


काळाची आपली एक गती असते, एक प्रवाह असतो. हा प्रवाह सतत बदलत असतो. या बदलत्या प्रवाहाशी जुळवून घेतच आपली वाटचाल सुरू असते. काळासोबत अनेक गोष्टी बदलत जातात, हे बदल स्वीकारले जातात, स्वीकारावेच लागतात. काळाच्या प्रवाहात टिकून राहायचे असेल तर दूसरा पर्याय नसतो. प्रत्येक जीवमात्रात ही प्रवृत्ती आढळून येते. मानव त्याला अपवाद नाही. आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर काळासोबत बदलावेच लागते. इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवप्राणी बौद्घिकदृष्ट्या खूप अधिक विकसित असल्याने या बदलांचे स्वरूप त्याच्यासाठी बरेच व्यापक असते. या बदलांचा थेट संबंध त्याच्या जीवनशैलीवर पडतो. हजार-पाचशे वर्षांपूर्वी एखादी गोष्ट उपयुक्त असेल तर ती त्या काळच्या संदर्भात उपयुक्त असते, आज त्या गोष्टीची उपयुक्तता कायमच असेल असे नाही. अशा वेळी केवळ रूढी, परंपरांच्या नावाखाली या कालबाह्य गोष्टींना चिकटून राहण्यात अर्थ नसतो. बदलाचे हे सूत्र ज्यांना समजते ते काळाच्या वेगाशी जुळवून घेण्यात यशस्वी होतात. ज्यांना हे जमत नाही ते साहजिकच विकासाच्या दौडीत मागे पडतात. पृथ्वीतलावरील मानवाच्या बौद्घिक विकासाची सरासरी गती सारखीच असली तरी सगळेच आज प्रगतीच्या समान टप्प्यावर आहेत, असे म्हणता यायचे नाही. काही देश, तर एखाद्या देशातील काही विशिष्ट समाज इतरांच्या तुलनेत विशेषत: आर्थिकदृष्ट्या अधिक प्रगत दिसतात. काळाच्या गतीशी अधिक लवकर आणि अनुकूल दिशेने जुळवून घेण्यात ते इतरांपेक्षा वेगवान ठरले हे त्यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे. मध्ययुगीन कालखंडात सातासमुद्रापलीकडून नवे नवे सागरी मार्ग शोधत युरोपीय व्यापारी भारताकडे येत होते त्याच काळात भारतात मात्र समुद्र ओलांडणे पाप समजले जायचे. या चुकीच्या धारणेने देशाचे खूप मोठे नुकसान झाले.जबरीने धर्मांतर करण्यात आलेल्यांना पुन्हा स्वधर्मात परतायचे असेल तर त्यालाही मोठ्या प्रमाणात विरोध व्हायचा. परतण्याचा हा मार्ग जवळपास बंदच होता. शिवाजी महाराजांनी या विरोधाला न जुमानता नेताजी पालकरांसारख्या मातब्बर सरदाराला पुन्हा स्वधर्मात प्रवेशित करून घेतले, परंतु असे उदाहरण अपवादात्मकच होते. विहिरीत खाण्याचा पाव (ब्रेड) टाकून ख्रिश्चन मिशन:यांनी गावचे गाव धर्मांतरीत करून घेतले होते. पाव त्याकाळी निषिद्घ समजला जायचा. त्यामुळे जो कोणी त्या पाव पडलेल्या विहिरीचे पाणी प्यायचा तो बाटला, असे समजण्यात येई. अशाप्रकारे बाटलेल्यांना पुन्हा स्वधर्मात जागा नसायची. असल्याच असंख्य खुळचट समजुतीमुळे आपल्या समाजाचे खूप नुकसान झाले आहे, आजही होत आहे. काळासोबत बदलणे, काळाच्या गतीशी जुळवून घेणे आजही या समाजाला जमलेले नाही. आजही अनेक कालबाह्य रूढी, परंपरा आपल्या समाजात ठाण मांडून बसल्या आहेत. साधे मृत्युपरांत संस्कारांचेच उदाहरण घ्या. एखाद्या घरात मृत्यू झाला की त्या घरातल्या सगळ्यांनाच तेरा दिवसाचे सुतक असते. हे तेरा दिवस बाहेरचे सगळे व्यवहार बंद असतात. कुणी कामावर जात नाही, काही व्यवसाय असेल तर तोही बंद ठेवला जातो. एकेका मिनिटाला मोल असलेल्या आजच्या या जगात तेरा दिवसाची निष्क्रियता कोणत्या भावात पडत असेल? परंतु हे समजून घ्यायला कुणाची तयारी नाही. मराठी समाजातच हे कर्मकांड मोठ्या प्रमाणात चालते. इतर समाजातले मृत्युपरांत कर्मकांड फारतर दोन, तीन दिवसात संपतात आणि चौथ्यादिवशी सगळ्यांची जगरहाटी पूर्ववत सुरू होते. मराठी समाजात मात्र अजूनही तेरा दिवसांचे सुतक पाळले जाते. ही प्रथा ज्याकालात रूढ झाली त्या काळात ती योग्यच होती. तेव्हा दळणवळणाची, संवाद साधण्याची वेगवान साधने नव्हती. दूरवरून नातेवाईक यायचे, इतक्या लांबून आल्यावर ते काही दिवस थांबणारच. सांत्वनासाठी आलेली ही मंडळी घरात असताना घरच्या इतरांनी आपले कामधंदे करणे प्रशस्त वाटत नव्हते. शिवाय त्याकाळी वैद्यकीय सुविधा फारशा नव्हत्या. प्लेग, टी.बी. किंवा तत्सम दुर्धर आजारांना लोक बळी पडत. दवाखाने वगैरे प्रकार नसल्यामुळे बहुतेक उपचार घरीच व्हायचे आणि मरणही घरच्या खाटेवरच यायचे. अशावेळी त्या व्याक्तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रोगाच्या विषाणूंचा संसर्ग इतरांना होण्याची शक्यता असायची. अशा परिस्थितीत त्या व्याक्तिच्या सतत संपर्कात आलेल्या त्या घरातील लोकांच्या माध्यमातून या विषाणूंचा प्रसार होण्याची शक्यता असायची. हे टाळण्यासाठी काही दिवस त्या घरातील लोकांनी इतरांच्या संपर्कात येऊ नये म्हणून सुतक पाळण्याची प्रथा पडली. मृत शरीर जाळताना शेणाच्या गोव:या, कडुलिंबाचा पाला वगैरेंचा वापर व्हायचा त्यामागेही जंतुसंसर्ग रोखणे हेच मुख्य कारण असायचे.

No comments:

Post a Comment