Sunday, February 10, 2008
मराठी बाणा महाराष्ट्राबाहेर
गेले दोन-चार दिवस मुंबईत प्रचंड राडा सुरू आहे. हा लेख तुमच्या हाती पडेपर्यंत कदाचित परिस्थिती निवळली असेल, परंतु आतमध्ये धुमसणारा सुप्त असंतोष शांत व्हायला वेळ लागेल. कदाचित होणारही नाही. राज ठाकरेंनी सार्वकालिक वादग्रस्त अशा मुद्याला हात घातला आहे. हा विषय उपस्थित करण्यामागे राज ठाकरेंचे राजकारण आहे की राज ठाकरेंना मराठी प्रेमाचे भरते आले म्हणून कुठल्याही राजकीय परिणामांची पर्वा न करता त्यांनी निव्वळ मराठी लोकांच्या हितासाठी हे पाऊल उचलले हे सांगता येत नाही. कारण काहीही असले तरी राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे सामाजिक अस्वस्थता प्रचंड वाढली हे सत्य आहे. मुंबई मराठी लोकांचीच ही जी टोकाच्या आग्रहाची भूमिका राज ठाकरेंनी मांडली आहे, ती एकूण सामाजिक स्वास्थ्याचा विचार करता निषेधार्हच म्हणावी लागेल. राज ठाकरेंच्या प्रक्षोभक वक्त्व्यानंतर आज मुंबईतील मराठी तरूण उत्तेजित झाला आहे. त्यामुळे हे तरुण (?) गटागटाने फिरत परप्रांतीयांवर हल्ले करीत आहेत. या आक्रमणाला प्रतिकारही होत आहे, त्यामुळे एकप्रकारचे गृहयुद्घ मुंबईत सुरू झाल्याचे भासत आहे. हे लोण इतरत्र पसरायला वेळ लागणार नाही. आपल्याकडे भावनिक मुद्यावर लोक चटकन पेटून उठतात. त्यामुळे जनमानसावर पकड असणारया नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करण्यापूर्वी दहादा विचार केला पाहिजे. दुर्दैवाने तसे होत नाही. किमान राज ठाकरेंसारख्या तरूण नेत्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती. मुंबई मराठी लोकांची आहे, हे सत्य कुणीच नाकारणार नाही. परंतु याचा अर्थ मुंबईत केवळ मराठी माणसांनीच राहावे असा होत नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे साहजिकच रोजगाराच्या शोधात मुंबईला येणार्यांची संख्या खूप मोठी आहे. या परप्रांतीय लोकांमुळे स्थानिक मराठी तरूणांच्या रोजगारावर परिणाम होतो, त्यांचे हक्क हिरावले जातात, हा आक्षेप मान्य केला तरी आज जेव्हा संपूर्ण जगच एका खेड्यासारखे झाले आहे तेव्हा आम्हाला आमच्या गावातच रोजगार मिळावा किंवा आमच्या गावातील रोजगारावर आमचाच हक्क, असा अट्टहास धरता येणार नाही. रोजगाराच्या शोधात कुणी कुठेही जाऊ शकतो, कुणालाच भाषा, प्रांत, धर्म या आधारावर रोखता येणार नाही. आज केवळ उत्तरप्रदेशी लोकांच्याच विरोधी हे आंदोलन चालू आहे. विरोध करायचाच असेल तर मग तो सर्वच परप्रांतीयांना का नाही ? आणि हुडकूनच काढायचे असले तर परप्रांतीयच का ? परदेशी बांग्लादेशी , पाकिस्तानी का नाही ? वाटल्यास त्याकरिता पोलिसांची मदत घ्या ! काळाची चक्रे आता उलटी फिरणे शक्य नाही. हे युग स्पर्धेचे आहे आणि ही स्पर्धा केवळ कार्पोरेट जगातच नाही. दोन फुटकळ भाजीविक्रेत्यांमध्येही स्पर्धा आहे. अशा परिस्थितीत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किंवा स्पर्धा जिंकण्यासाठी प्रतिस्पध्र्यांना स्पर्धेतूनच घालविण्याचा प्रयत्न उचित तर नाहीच शिवाय तो यशस्वी होणाराही नाही. आपली योग्यता वाढविणे, आपला दर्जा उंचावणे, आपले क्षितीज विस्तारणे हाच एकमात्र मार्ग यावर उपलब्ध आहे. केवळ मुंबईच मराठी माणसांची का? संपूर्ण जगच मराठी माणसांचे करण्याची जिद्द का बाळगली जात नाही? जो सक्षम आहे तोच टिकेल, हाच या स्पर्धेच्या युगाचा मूलमंत्र आहे. येणारया दिवसांमध्ये प्रामाणिकपणा, मेहनत करणारा, नवनवीन तंत्रज्ञान- पद्घत शिकणारा हे परवलीचे शब्द ठरणार आहेत. आणि त्याच लोकांना मागणी राहणार आहे. आणि या गुणांमध्ये मराठी माणुस कुठेच मागे नाही आणि म्हणूनच तो पुढे जाणारच आहे. परप्रांतीय मुंबई काबिज करत असतील तर तुम्ही जग काबिज करायला निघा. शेवटी आपल्या मर्यादेचे वर्तुळ भेदून जे बाहेर पडले तेच जिंकले, हा इतिहास आहे. पेशव्यांच्या काळात मराठ्यांचा संपूर्ण उत्तर आणि पूर्व भारतात जबर दरारा होता. मराठ्यांना रोखण्याची कुणाची टाप नव्हती. मराठे आले एवढ्या वार्तेनेही अनेक राजे, सरदार, जहागिरदार गर्भगळीत होत. शेवटी प्रश्न ताकदीचा आणि क्षमतेचा आहे. तुमची रेषा मोठी करण्यासाठी शेजारची रेषा लहान करण्याची किंवा पुसण्याची गरज नाही आणि ते व्यावहारिकदृष्ट्या शक्यही नाही. तुम्हाला तुमची रेषाच मोठी करावी लागेल. तुम्ही दिल्लीत जा, बिहार, उत्तरप्रदेश, केरळ, तामिळनाडू कुठेही जा, तिथे तुमचे विश्व उभे करा, ते मुंबई काबिज करत असतील तर प्रत्युत्तर म्हणून तुम्ही उभा भारत काबिज करा. किमान दिल्ली काबिज करा. मुकाबला याच मार्गाने होऊ शकतो. मुंबईकर मराठी तरूणांच्या क्रोधाला गरीब, मजूर, टॅक्सी ड्रायव्हर, लहान-मोठे व्यवसाय करणारे परप्रांतीय बळी पडत आहेत. हे कृत्य समर्थनीय ठरू शकत नाही. गरीब परप्रांतीयांना मारहाण करून प्रश्न सुटणार नाही. उद्या इतर प्रांतात याच्या प्रतिक्रिया उमटल्या तर तेथील मराठी माणसांना पळता भुई थोडी व्हायची. तशा थोड्याथोड्या प्रतिक्रिया उमटायलाही लागल्या आहेत. मुंबईत तरी संपूर्ण मीडिया, अनेक राजकीय पक्ष परप्रांतियांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. इतर प्रांतात मराठी लोकांवर असा हल्लाबोल झाला तर त्यांव्या पाठीशी कोण उभे राहणार? शेवटी राज्याच्या सीमा भाषेच्या, जातीच्या, धर्माच्या भिंतींनी बंदिस्त करता येतील का, हाच मौलिक प्रश्न उभा राहतो आणि त्याचे उत्तर नाही, असेच राहणार. मराठी तरूणांमध्ये धमक नाही, असा आरोप कुणीही करू शकत नाही. मराठी लोकांच्या कर्तृत्वाला इतिहास जसा साक्षी आहे तसाच वर्तमानही आहे. तामिळ जनतेच्या हृदयाची धडकन म्हणून ओळखला जाणारा रजनीकांत मूळ मराठीच आहे. अमेरिके'या दादागिरीला आव्हान देत `परम' महासंगणकाची निर्मिती विजय भटकर या मराठी माणसानेच केली. जिच्या सुरावटीवर अवघे जग डोलते ती लता मंगेशकर याच मराठी मातीतील आहे. दिल्लीत अनेक मराठी माणसे उ'चपदावर काम करीत आहेत. क्षेत्र कोणतेही असो, इतर लोक मराठी माणसाच्या वकुबाला वचकून असतात. तुमची अर्थनीती मला मान्य नाही, असे थेट पंडित नेहरूंना ठणकावून सांगत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा त्यांच्यासमोर भिरकविण्याची हिंमत चिंतामणराव देशमुख या मराठी माणसानेच दाखविली होती. शिवाजी झोंबाडे नामक मराठी माणसाने हरयाणातील कर्नाल येथे कल्पना चावलाची फॅक्टरी विकत घेऊन आपले औद्योगिक विश्व उभे केले. शोधच घ्यायचा ठरवला तर ठायी ठायी मराठी माणसाच्या कर्तृत्वाचे झेंडे रोवलेले दिसतील. सांगायचे तात्पर्य मराठा गडी कुणाच्या स्पर्धेला घाबरून मागे हटणारा नाही. ज्यान्च्यात वकुब नसतो तेच स्पर्धेला घाबरतात. त्यामुळे मुंबई किंवा महाराष्ट्रातील परप्रांतीयांच्या घुसखोरीला घाबरून उर बडवून घेण्यात अर्थ नाही. त्यांची झेप मुंबई पलीकडे जाऊ शकत नाही आणि मराठी माणसांच्या भरारीला क्षितीज नाही. राज ठाकरेंनी मुंबईतील परप्रांतीयांविरूद्घ बिगुल फुंकण्याऐवजी मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी तरूणांना जग जिंकण्यासाठी प्रवृत्त करावे. त्यांच्याट तेवढा आत्मविश्वास निर्माण करावा. महाराष्ट्राचे नवनिर्माण करण्याचा तो एक उत्तम मार्ग आहे. याकामी राज ठाकरेंनी पुढाकार घ्यावा आम्ही त्यांना हवी ती मदत करायला तयार आहोत. मराठी तरूण कुठेही कमी पडणार नाही, त्याच्याट तेवढी धमक आणि योग्यता आहेच. फ़क्त प्रश्न आहे तो आत्मविश्वासाचा. हा आत्मविश्वास जागृत करायला हवा आणि एकवेळ हा आत्मविश्वास जागृत झाला की केवळ मुंबईच काय, भारताच्या आणि जगाच्याही कोप:याकोप:यात झेंडा रोवलेला दिसेल तो मराठी कर्तृत्वाचाच. आपले कुंपण आपलेच आहे, त्यात आपण केव्हाही शेर होऊ शकतो. खरे आव्हान कुंपणापलीकडे असते, हेच आव्हान आम्ही स्वीकारायला हवे. आज इतर अनेक प्रांतातील सामान्य वकुबाचे लोक महाराष्ट्रात य्ऊन मोठे झाले ते केवळ त्यांनी आपले कुंपण ओलांडण्याची हिंमत आणि जिद्द दाखविली म्हणूनच. हीच हिंमत आणि जिद्द मराठी तरूणांनी दाखविली तर जग जिंकायला असा कितीसा वेळ लागेल?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment