Sunday, February 3, 2008

बदल विकासाचा आत्मा


राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवासाठी मातृतिर्थ सिंदखेड राजा इथे जनसागर उसळला होता. अक्षरश: लाखो लोक तिथे जमले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात स्वत:ची एक वेगळी वाट, स्वत:चा एक वेगळा प्रवाह निर्माण करणारया मराठा सेवा संघाने, अर्थात पुरूषोत्तम खेडेकर आणि त्यांच्या सहकार्यान्नी शिवधर्माची दिक्षा घेण्याचे आवाहन उपस्थितांना केले. शिवधर्म हा कोणता नवा धर्म नाही, हे इथे स्पष्ट केले पाहिजे. जसे एखाद्या वस्तुवर धुळीची पुटे चढून, जाळे लागून कालांतराने त्या वस्तुची मूळ आकृती आणि मूळ स्वरूप आछादिले जाते आणि काही वेगळेच समोर येते तसे काहीसे हिंदू धर्माचे झाले आहे. ती धूळ झटकल्यावर, जाळे-जळमटे स्वछ केल्यावर तीच वस्तु अगदी नव्या स्वरूपात समोर येते आणि आपल्याला ओळखूही येत नाही. आपल्याला ती वस्तू नवीच वाटते. शिवधर्म म्हणजे दूसरे-तिसरे काहीही नसून आपल्या पारंपरिक धर्मावरील अंधविश्वासाची, अंधश्रद्घेची, जातीभेदाची, बुवाबाजीची, पुरोहिशाहीची धूळ झटकल्यावर समोर आलेले लखलखीत स्वरूप आहे. मी शिवधर्माला कृषीधर्माची उपमा दिली, ती स्वीकारल्या गेली. आपण ज्या धर्माला हिंदू धर्म म्हणतो त्या धर्माचा कुणी संस्थापक नाही, एखादा निश्चित असा आधार ग्रंथ नाही, अगदी सर्वोच्च न्यायालयानेही हिंदू हा धर्म नसून एक जीवनशैली असल्याचे म्हटले आहे. एखाद्या धर्माचा आधार सामान्य जीवनशैली असेल तर तो आधार समाजातल्या मूठभर लोकांशी संबंधित राहत नाही. बहुजनांची जीवनशैली तीच समाजाची जीवनशैली. परंतु कालांतराने हिंदू धर्मातून बहुजनांचे महत्त्व, त्यांचे स्थान, त्यांचे वर्चस्व हळूहळू संपविण्यात आले. खरेतर हिंदू धर्म तिथेच संपला होता. मूठभर पुरोहितांच्या हातात या धर्म एकवटला. ते म्हणतील तो सूर्य, ते म्हणतील तो चंद्र अशी स्थिती निर्माण झाली. अंधश्रद्घेचे, बुवाबाजीचे पेव फुटले. निखळ वैज्ञानिक दृष्टीकोन केव्हाच लोप पावला. समाजाचा आर्थिक आणि सांस्कृतिक कणा असलेला कृषक वर्ग एका कोपरयात ढकलल्या गेला. तथाकथीत हिंदू धर्म आपले मूळ स्वरूपच हरवून बसला. ही धूळ झटकणे भाग होते. आता शिवधर्माच्या माध्यमातून हे काम होत आहे. शिवधर्माचे विज्ञानवादी तत्त्वज्ञान मला आकर्षून गेले. आणि म्हणूनच तिथल्यातिथे मी सुद्घा हा शिवधर्म स्वीकारत असल्याचे जाहिर केले वृत्तांत छापून आल्यानंतर मी अकोल्यात असतांना अनेकांच्या भुवया उंचावल्या. घरची लग्ने पार पडली का, अश्या कोपरखल्याही मिळाल्या लोकांची हीच शंकेखोर विचारसरणी विकासाकरिता अडचणीची ठरत आहे. भूतकाळातही या आधारहिन सनातनी विचारांमुळे हिंदू धर्माचे खूप नुकसान झाले, आताही ते होत आहे. मी शिवधर्माचा पुरस्कार केला म्हणजे खूप मोठे क्रांतिकारी पाऊल वगैरे उचलले नाही. शेवटी धर्म म्हणजे तरी काय? आपला जीवनप्रवास सुसह्य करणारा एक विचार, एक मार्ग यापेक्षा अधिक काय? आपण कोणता मार्ग निवडावा याचे स्वातंत्र्य आपल्याला नसावे का? असे स्वातंत्र्य नाकारणारा धर्म, हा धर्म असू शकतो का? मार्ग निवडण्याचे आणि वेळप्रसंगी तो बदलण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकालाच असायला हवे. शिवधर्माचा विज्ञानवाद मला पटला म्हणून मी शिवधर्मी झालो. मला भगवान बुद्घाचे तत्त्वज्ञानदेखील पटते. त्या अर्थाने मी बौद्घधर्मीयदेखील आहे. मी तीन-चार वेळा विपश्यना केली आहे. मुस्लिमांच्या नमाजचे मला नेहमीच कौतुक वाटत आले आहे. शरीर आणि मन शुद्घीच्या दृष्टीने विचार करता नमाज हा उत्कृष्ट प्रार्थना प्रकार आहे. रोजा पाळल्याने शरीर शुद्घी होते. नमाजाच्या वेळी करावयाच्या क्रिया आणि त्यांचा क्रम लक्षात घेता नमाजात आणि प्राणायाम किंवा स्वामी रवीशंकरजी प्रसार करीत असलेल्या सुदर्शन योगात फारसे अंतर नसल्याचे दिसून येते. सुर्यास्तापूर्वी जेवण्याचे आणि अजिबात उष्टे न टाकण्याचे तसेच जीवहत्या न करण्याचे जैनांचे आचरणही प्रभावित करून जाते. सांगायचे तात्पर्य मला सगळ्या धर्मातील सगळ्या चांगल्या गोष्टींचे आकर्षण आहे आणि त्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या आचरणात याव्यात, आपल्या जीवनशैलीचा भाग बनाव्यात असे मला नेहमी वाटते. तसे पाहिले तर प्रत्येकाची जीवन जगण्याची स्वतंत्र शैली असते, प्रत्येकाचा जीवनाकडे पाहण्याचा एक स्वतंत्र दृष्टीकोन असतो. त्या अर्थाने प्रत्येकाचा एक स्वतंत्र धर्म असतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अशा परिस्थितीत आपल्याला योग्य वाटणारया मार्गाने जाण्याचा, त्या मार्गाचा पुरस्कार करण्याचा आणि वेळप्रसंगी वेगळा मार्ग चोखाळण्याचा अधिकार प्रत्येकाला असायला हवा. आयुष्य जगत असताना येणारया अनुभवातून मनुष्य वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होत जातो. अशावेळी आजपर्यंत आपण चुकीच्या मार्गाने प्रवास करीत होतो किंवा ज्या मार्गावर चालण्यास आपल्याला बाध्य करण्यात आले तो मार्ग आपल्या विचारांना आणि विकासाला पूरक ठरणार नाही, हे त्याच्या लक्षात आले तर त्याला मार्ग बदलायचे स्वातंत्र्य असते, किंवा असायला हवे. हा बदल आयुष्यात कितीही वेळा होऊ शकतो, कारण उजाडणारा प्रत्येक दिवस एक नवा विचार, एक नवी दिशा घेऊन उजाडत असतो. बहुतेक धर्मामध्ये हे स्वातंत्र्य नाकारण्यात आले आहे. हिंदु धर्मही त्याला अपवाद नाही. जाती-पातीच्या चिरेबंदी कारगृहात या धर्माला कैद करण्यात आले. जातीसोबत माती खावीच लागते, हा विचार हेतूपुरस्सर दृढ करण्यात आला. प्रत्येकाच्या डोळ्यावर झापडे बसविण्यात आली. विचारांचे आकाश त्या झापडांपुरतेच बंदिस्त झाले. शतकानुशतके ही व्यवस्था चालत आली. त्यामुळे जातीपातीच्या भिंती इतक्या मजबूत होत गेल्या की कितीही शिकला तरी माणसाच्या मनातून आणि आचरणातून `जात' जात नव्हती. खेडेकरांच्याच भाषेत सांगायचे तर समाजाला `हगणदारी'चे स्वरूप प्राप्त झाले होते. या हगणदारीतून बाहेर पडून मोकळा श्वास घेण्याचे आवाहन आणि आव्हान शिवधर्माने लोकांसमोर ठेवले. कोणत्याही धर्माचा आधार हा केवळ बुद्घिप्रामाण्यवाद आणि विज्ञानवादच असू शकतो, या व्यतिरिक्त दूसरा कोणता आधार असेल तो धर्म शेवटी वैचारिक गुलामगिरीचेच प्रतिनिधित्व करणारा ठरतो. माणसाची ही वैचारिक कुंठित अवस्था शिवधर्माला मान्य नाही. समानतेच्या आधारावर एक नवा समाज निर्माण करण्याचे ध्येय समोर ठेवून शिवधर्माची स्थापना झाली आहे आणि हाच पायाभूत विचार माझ्या मनाला स्पर्शून गेला आणि मी शिवधर्मी झालो. हा एक वैचारिक बदल आहे. विचार प्रवाहासारखे असतात. नित्य नवे वळण घेणारे, नित्य नव्या गोष्टी सामावून घेणारे आणि त्यातूनच शुद्घ होत जाणारे. वाहते पाणीच शुद्घ आणि स्व'छ असते, थांबलेल्या पाण्याला दुर्गंधीच येते.

No comments:

Post a Comment