Thursday, September 11, 2008
"काळा"चा इशारा!
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. अपेक्षेप्रमाणे बराक ओबामा निवडून आले. अर्थात त्यांची निवड अपेक्षित असली तरी ती इतक्या सहजासहजी झालेली नाही. ओबामांना आपण मात देऊ शकत नाही, हे लक्षात येताच त्यांच्या प्रतिस्पर्ध्यानी खास ठेवणीतली हत्यारे बाहेर काढीत ओबामांच्या वर्णाची चर्चा सुरू केली. त्यांच्या कुटुंबीयांची कुंडली बाहेर काढून त्यांच्या वंशाची चिरफाड होऊ लागली. अमेरिका भौतिकदृष्टीने कितीही पुढारलेला असला तरी जगात सर्वत्र आढळणारे सामाजिक दुर्गुण अमेरिकन जनमानसातही तितक्याच खोलवर रुतलेले आहेत. अब्राहम लिंकनच्या काळापासून सुरू झालेला वर्णद्वेषाविरुद्घचा लढा अगदी आता आतापर्यंत, साठच्या दशकापर्यंत सुरू होता आणि आजही अमेरिकतून वर्णद्वेषाचे पुर्णतः उच्चाटन झालेले नाही. वर्णद्वेषाचे अमानवीय संस्कृतीविरुद्घ लढा देणा:या मार्टिन ल्यूथर किंगचा खून करणारी, नेल्सन मंडेलाला अर्धे आयुष्य तुरुंगात काढण्यासाठी भाग पाडणारी वंशश्रेष्ठत्वाची ही मानसिकता आजही काही प्रमाणात का होईना, पण कायम आहे. गो:यांच्या या मानसिकतेला, त्यांच्या मनात अजूनही खोलवर अस्तित्व टिकवून असलेल्या वांशिक श्रेष्ठत्त्वाच्या अहंकाराला फुंकर घालीत ओबामांचा विजयरथ रोखण्याचे प्रयत्न झाले. ओबामांची लोकप्रियता पाहता त्यांच्या विरोधकांकडे तोच एकमात्र पर्याय उरला होता. जागतिक राजकारणाचा विचार करता, मग ते अमेरिकेतले असो अथवा भारतातले ही संकुचित विचारसरणी नेहमीच प्रभावी ठरत आली आहे. जात, भाषा, वंश, धर्म आदींचे संकुचित राजकारण नेहमीच विकासाच्या राजकारणाला मात देत आले आहे. यावेळी अमेरिकेतही तसेच काही होईल, अशी साधार भीती व्यक्त होत होती. सुदैवाने तसे काही झाले नाही. अमेरिकेत गो:यांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या जवळपास ७० टक्के आहे. या ७० टक्के गो:यांनी एका आफ्रीकी -अमेरिकन वंशाच्या अश्वेत माणसाची अमेरिकेच्या अध्यक्षपदी प्रचंड मताधिक्क्याने निवड केली. अमेरिकेत अध्यक्षाची निवड थेट मतदानाने होत असते, हे इथे लक्षात घ्यावे लागेल. ही घटना खरोखरच ऐतिहासिक म्हणावी लागेल. अमेरिकेत जवळपास एक चतुर्थांश असलेल्या अश्वेत नागरिकांना आपल्या वर्णाचा माणूस अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी ४४व्या निवडणुकीपर्यंत वाट पाहावी लागली. शेवटी न्याय झाला. अमेरिकन लोकांनी आपल्या वंश श्रेष्ठत्वाच्या भावनेपेक्षा मानवी मूल्यांना, श्रमाच्या प्रतिष्ठेला अधिक महत्त्व दिले. अमेरिकन लोकांनी दाखविलेले हे शहाणपण आपण कधी दाखविणार? आपण आजही जात, धर्म, वंश, भाषेच्या संकुचित वर्तुळातच वावरत आहोत. आपल्याकडच्या राजकारणावर आजही याच गोष्टींचा भरपूर पगडा आहे. कोणत्याही उमेदवाराला निवडून येण्यासाठी इतर कोणत्याही बाबींपेक्षा याच गोष्टी अधिक महत्त्वाच्या वाटतात. कोणत्याही पक्षाचे राजकारण जात, धर्म, वंश, भाषेच्या संकुचित कुंपणांना ओलांडून अधिक व्यापक होताना दिसत नाही. आम्ही मराठी, आम्ही बिहारी, आम्ही हिंदू, आम्ही अल्पसंख्याक हा अहंकार अजूनही इतका मोठा आहे की राष्ट्राचे हित त्यापेक्षा मोठे आहे, गरिबाची भूक त्यापेक्षा अधिक तीव्र आहे हा विचारच आमच्या मनात येत नाही. या देशात विविधता आहे, ही विविधता बहुआयामी आहे. जात, धर्म, वंश, भाषा, चालीरीती, पेहराव असे अनेक आयाम या देशाच्या विविधतेला जोडलेले आहेत. परंतु, या सगळ्या मिश्रणातून भारत नावाचे एक संयुग तयार झाले आहे, हे विसरता येणार नाही. दुर्दैवाने आज ते विसरल्या जात आहे. राज ठाकरेंना, शिवसेनेला राजकारण करायचे आहे म्हणून त्यांनी मराठी अस्मितेचा, हिंदुत्वाचा मुद्दा हाताशी धरला आहे; परंतु इतरांचे काय? आघाडी सरकारने राज ठाकरेंना प्रोत्साहन दिले ते काय व्यापक राष्ट्रहित लक्षात घेऊन? दुस:याकडे बोट दाखविणे सोपे असते, परंतु त्याचवेळी आपल्याकडे वळलेल्या चार बोटांकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले जाते. मुंबईत एका टॅक्सीवाल्याने महिलांशी अभद्र व्यवहार केला आणि तिथे असलेल्या लोकांनी त्याला ठोकले, त्याच्या टॅक्सीची काच फोडली. ही एकच घटना त्याचा चुकीचा संदर्भ देऊन हिंदी-इंग्रजी वाहिन्यांनी वारंवार दाखवून महाराष्ट्रात कसे अराजक सुरू आहे, परप्रांतीयांना इथे कसे छळले जाते, याचे चर्वितचर्वण दिवसभर सुरू ठेवले, या बेजबाबदारपणाचा जाब कोण कुणाला विचारणार? इतर कोणत्याही प्रांतात नसतील तेवढे परप्रांतीय आज महाराष्ट्रात सुखासमाधानाने नांदत आहेत. महाराष्ट्र विधिमंडळात जितके गैरमराठी आहेत तितके तर इतर कोणत्याही प्रांताच्या विधिमंडळात नसतील. बिहारी नेत्यांनी आधी एखाद्या मराठी माणसाला मंत्री करून दाखवावे, हे नारायण राणेंचे आव्हान, चुकीचे कसे म्हणता येईल? इथे एका बिहारी तरुणाचा रेल्वेतून पडून अपघाती मृत्यू झाला तर त्याची शहानिशा न करताच राज ठाकरेंविरुद्घ खुनाचा गुन्हा दाखल करण्यापर्यंत बिहारी नेत्यांची मजल गेली आणि तिकडे एका मराठी महिला अधिका:याच्या कार्यालयावर दोनशे जणांच्या जमावाने हल्ला केला तरी इकडे साधा निषेध नाही. दिल्लीतले महाराष्ट्र सदन फोडले जाते आणि त्याची प्रतिक्रिया इकडे उमटत नाही. ही मराठी लोकांची सहिष्णुता की बावळटपणा, हा पुन्हा वादाचा विषय होईल. परंतु, राष्ट्रीय एकात्मता म्हणून जे काही आहे, ते महाराष्ट्राने जितक्या चांगल्या प्रकारे जोपासले ते इतर कोणत्याही प्रांताला जमले नाही, जमणार नाही. इथे मारवाडी आले, गुजराती आले, सिंधी तर थेट पाकिस्तानातून आले आणि दुधात साखर विरघळावी तसे विरघळून गेले. महाराष्ट्रात आले आणि मराठी झाले. बिहारींना, उत्तर भारतीयांना ते का जमू नये? इथे येऊन आपले वेगळे अस्तित्व जपणे, आपला राजकीय दबावगट तयार करणे आणि इथल्या लोकांनाच `घाटी' म्हणून हिणवणे, हे कोणत्या संस्कृतीत बसते? तुम्ही ज्याला राजकारण म्हणता तेच इथल्या राज ठाकरेंनी, शिवसेनेने केले की संकुचित प्रांतवाद किंवा देशद्रोह कसा ठरतो? क्रियेला प्रतिक्रियेने उत्तर मिळणारच, वादाने वाद वाढत जाणारच. अशा वेळी वाद कोणत्या गोष्टीसाठी घातला जात आहे, त्यात कुणाचे हित साधले जात आहे, हे तपासून पाहणे गरजेचे ठरते. आपल्या अंतर्गत वादाची परिणती शेवटी देश कमजोर होण्यात होणार आहे. आपली जी काही ताकद आहे ती एक देश म्हणूनच कायम राहणार आहे, अंतर्गत वादाने ही ताकद कमी झाली की आपले हाल कुत्रेही खाणार नाही. या फुटीरतेमुळेच आजवर आपल्या देशावर असंख्य वेळा गुलामी लादली गेली. पेशव्यांनी इंग्रजांविरुद्घ निर्णायक युद्घ छेडले तेव्हा नागपूरकर भोसले तटस्थ राहिले आणि शिखांनी तर जुना हिशेब चुकता करण्यासाठी चक्क इंग्रजांच्या बाजूने युद्घात भाग घेतला. परिणाम काय झाला, हा देश मूठभर इंग्रजांच्या गुलामीत गेला. या इतिहासापासून आपण काहीच बोध घेणार नाही का? आजही आपण जात, भाषा, धर्म आदींच्या संकुचित अहंकारांनाच चिकटून बसणार आहोत का? एक नवी अमेरिका उभा करण्याचा नारा ओबामा देतात आणि सगळी अमेरिका ओबामांचा वर्ण, वंश विसरून भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभी राहते. आपल्याला ते कधी जमणार? ओबामांचा हा विजय केवळ अमेरिकेपुरताच मर्यादित नाही तर त्यांच्या या विजयाने आता यापुढे संकुचित विचारांना जगात थारा मिळणार नाही, यापुढच्या राजकारणावर राष्ट्रहिताचा विचार करणा:यांचाच पगडा असेल, हा संदेश जगभर पोहोचविला आहे. हा संदेश आम्हालाही समजून घ्यायला हवा. ओबामांना विजयी करून काळाने वंशश्रेष्ठत्वाच्या अमानवीय विचारांवर सूड उगवला आहे आणि आता सगळीकडे हेच होणार आहे. धर्म, जात, भाषा, प्रांत या संकुचित मुद्द्यांना जगभरात मूठमाती मिळणार आहे. यापुढे प्रतिष्ठा केवळ श्रमालाच प्राप्त होणार आहे. हा बदल काळच घडवून आणणार आहे. त्याची सुरुवात ओबामांच्या विजयाने झाली आहे. फ़क्त आम्ही काळाची पावले ओळखून हा बदल लवकरात लवकर स्वीकारतो की नेहमीप्रमाणे अमेरिकेच्या काही दशके मागे राहतो, हे मात्र येणारा काळच सांगेल!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment