Sunday, April 19, 2009

जीवनात तत्त्वांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.


जीवनात तत्त्वांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तत्त्वं नसती आणि त्यांचे पालन करणारी माणसे नसती तर माणुसकी हा शब्दही कदाचित जन्माला आला नसता. दुर्दैवाने अलीकडच्या काळात तत्त्वांना अडगळीत टाकून स्वार्थ साधून घेणारया लोकांना खोटी का होईना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. या खोट्या प्रतिष्ठेसाठी खुंटीवर टांगून ठेवल्या जाणारया तत्त्वांमध्ये निष्ठेचा क्रमांक बराच वरचा लागतो. विशेषत: राजकारणाच्या क्षेत्रात तर अलीकडे निष्ठेचे सारे संदर्भच बदलले आहेत. कोण आपली निष्ठा केव्हा कोणाच्या पायी अर्पण करेल, याचा काहीही नेम राहिलेला नाही.प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले आहे, ''कोणाच्याही निष्ठा दोघांच्या ठायी असू शकत नाहीत. प्रत्येक व्यक्ती एक तर एकाचा दुस्वास करेल अन् दुसरयावर प्रेम करेल किंवा ती एकाप्रती समर्पित असेल अन् दुसरयाचा तिरस्कार करेल. प्रभू येशू ख्रिस्तांनी हे विधान केले, तेव्हा भारतात लोकशाही प्रणालीचा जन्म व्हायचा होता. त्यांनी जर भारतातील आजचे राजकारण अनुभवले असते तर हे विधान नक्कीच केले नसते. कपडे बदलावे तेवढ्या सहजतेने निष्ठा बदलणारया माणसांची आज भारतीय राजकारणात अजिबात वाणवा नाही. अर्थात, निष्ठा बदलल्यास त्याचे फळ मिळत असल्यामुळे आणि त्या फळापोटी खोटी प्रतिष्ठा, मानमरातब, धनसंपत्ती लाभत असल्यानेच अशा लोकांचे अलीकडे मोठे पीक आले आहे. अशा लोकांना 'सूर्याजी पिसाळची अवलाद' या बिरुदाने हिणवल्या जाण्याचे दिवस तर केव्हाच मागे पडले, उलट आजकाल असे लोक इतरांचे आदर्श बनायला लागले आहेत.यावेळी नमनालाच निष्ठेचे घडाभर तेल जाळण्याचे कारण म्हणजे पंधराव्या लोकसभेची निवडणूक! विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघांत राजकारणात निष्ठेची कशी किंमत केली जाते, याची चुणूक दिसली आहे. यवतमाळ-वाशिम मतदारसंघात निवडणुकीच्या तोंडावर निष्ठा बदलणारया हरिभाऊ राठोडांना निष्ठा बदलण्याचे बक्षीस मिळाले आहे, तर उत्तमराव पाटील यांच्यासारख्या निष्ठावंताला निष्ठावंत राहिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीसच्या रूपाने 'पुरस्कार' लाभला आहे! तिकडे भंडारा-गोंदिया मतदारसंघातही नाना पटोलेंसारख्या निष्ठावंत, संवेदनशील, मतदारांप्रती समर्पित नेत्याचाही पक्षातून निलंबित करून 'गौरव' करण्यात आला आहे!! पतिव्रतेला धोंडा अन् वेश्येला मणिहार, या मराठी भाषेतील म्हणीचे अशावेळी आपसुकच स्मरण होते. काय चुकले होते उत्तमराव दादांचे, की त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली? काय चुकले होते त्यांचे, की त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली? तब्बल सात वेळा यवतमाळ मतदारसंघातून निवडून येण्याएवढा जनाधार त्यांना प्राप्त होता, ही त्यांची चूक होती का? की त्यांनी उमेदवारी नाकारल्याबरोबर दुसरा घरठाव केला नाही, बंडखोरी केली नाही, ही चूक होती? की त्यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोडणारया यवतमाळ जिल्ह्यातील भागांत, त्या मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराचे काम सुरू केले होते, हा त्यांचा गुन्हा होता? एक माणूस ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय गणिते मांडून केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी तुमच्या पक्षात येतो अन् तो तुम्हाला तो एवढा गोड होतो की त्याला लगेच उमेदवारी मिळते! त्यासाठी तब्बल सहा वेळा त्या मतदारसंघातून निवडून येण्याचा भीमपराक्रम करणारया व्यक्तीला चक्क डावलल्या जाते!! हीच का निष्ठेची किंमत? आणि निवडणूक जवळ येताबरोबर तुमच्या पक्षाचा पुळका येणारया व्यक्तीची कर्तबगारी ती काय? तुमचे सरकार अडचणीत असताना तत्त्वं, निष्ठा खुंटीवर टांगून ठेवीत त्याने तुम्हाला मदत केली, हीच ना? आणि कशासाठी केली मदत? तुमच्या पक्षाबद्दल फार पुळका आला म्हणून? तुमच्या पक्षाची ध्येयधोरणे, तत्त्वं अचानक खूपच आवडायला लागली म्हणून? अजिबात नाही! त्यांनी निष्ठा बदलण्याचे एकमेव कारण हे होते, की मतदारसंघ फेररचनेच्या पृष्ठभूमीवर, ते आधी होते त्या पक्षात राहून त्यांचा वैयक्तिक स्वार्थ साधल्या गेला नसता. फेररचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या मतदारसंघावर आपल्या पक्षाचा मित्रपक्ष दावा सांगणार आणि तो मान्य केला जाणार, याची राजकीय गृहीतके पक्की असलेल्या हरिभाऊ राठोडांना पूर्ण कल्पना आली होती आणि त्यामुळेच त्यांनी निष्ठा बदलली, हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ सत्य आहे. उद्या काँग्रेसमध्ये आपला स्वार्थ साधल्या जात नाही याची खात्री झाल्यास ते आणखी तिसरा घरठाव करणार नाहीत, याची हमी ती काय? यवतमाळ-वाशिम मतदारसंघात जे उत्तमराव दादांसोबत काँग्रेसने केले, ते भंडारा-गोंदिया मतदारसंघात नाना पटोलेंसोबत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मित्रपक्षांनी एकत्रितरित्या केले. सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराचे कुटुंब अवैध सावकारी करून शेतकर्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडीत असताना त्याच पक्षाचा दुसरा आमदार शेतकर्यांच्या प्रश्नावर चक्क आमदारकीला लाथ मारतो! छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असे घडले असते तर महाराजांनी नक्कीच हातातील कडे नाना पटोलेंच्या हातात घातले असते अन् ज्या मुद्द्यावर पटोलेंना राजीनामा द्यावा लागला, त्या मुद्द्यासंदर्भात दोषी असलेल्यांना कोडे मारले असते. आमचे दुर्दैव हे आहे, की ती शिवशाही होती अन् ही लोकशाही आहे. इथे शिवशाहीचा उपयोग केवळ निवडणुकीच्या प्रचारापुरता असतो, शिवजयंतीला मिरवणुका काढण्यापुरता असतो, दूरचित्रवाणीसाठी मालिका तयार करून किंवा चित्रपट काढून गल्ला जमविण्यापुरता असतो! वास्तविक पटोलेंच्या रूपाने शेतकर्यांच्या प्रश्नांची जाण असलेला, अभ्यासू, निष्ठावंत नेता गमाविण्याऐवजी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने थोडे समजदारीने घेतले तर भागले असते. नाना पटोलेंचा लाखांदूर विधानसभा मतदारसंघ फेररचनेत गडप झाला आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचाच प्रश्न उभा ठाकला आहे. दुसरीकडे भंडारा-गोंदिया मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवित असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची अद्याप तीन वर्षे शिल्लक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडला असता किंवा तो काँग्रेसने मागून घेतला असता तर नाना पटोलेंचे सहज राजकीय पुनर्वसन करता आले असते. तसे झाल्यास इथे निष्ठेची हीच किंमत होते, हा संदेशही कार्यकर्त्यांमध्ये गेला नसता. उल्लेखनीय म्हणजे, ही समजदारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने रामदास आठवले आणि डॉ. राजेंद्र गवई या रिपब्लिकन पक्षांच्या नेत्यांसाठी दाखवली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याची जागा लढविलेले रामदास आठवले यावेळी काँग्रेसच्या वाट्याची जागा लढवित आहेत, तर काँग्रेसच्या वाट्याची जागा लढवित आलेल्या रा.सू. गवईंचे चिरंजीव असलेले डॉ. राजेंद्र गवईंनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याची जागा लढविली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना मित्रपक्षांसाठी दाखविलेली हीच समजदारी दोनपैकी एका पक्षाच्या अभ्यासू नेत्यासाठी का दाखविता आली नाही? का त्याला बंडखोरी करण्यास भाग पाडण्यात आले आणि अखेर निलंबित करण्यात आले? अर्थात, हा विषय काही केवळ काँग्रेसपुरताच मर्यादित नाही. ही लागण सर्वच पक्षांना झाली आहे. उडदामाजी काय निवडावे काळे-गोरे, हाच प्रश्न आहे!उत्तमराव पाटील आणि नाना पटोले या दोघांच्या संदर्भात जे काही झाले त्याला आणखी एक कंगोरा आहे. पाटील आणि पटोले हे दोघेही बहुजन आहेत. कुणबी समाजाचे आहेत. (स्वत:ला मराठा, पाटील, देशमुख, पंचकुळी, शहाण्णव कुळी म्हणविणारे सर्वच कुणबी आहेत, ही माझी वैयक्तिक धारणा आहे, जी मी वेळोवेळी जाहीर केली आहे आणि त्या धारणेनुसारच मी येथे कुणबी हा शब्द वापरला आहे.) विदर्भात हा समाज बहुसंख्य आहे; मात्र दुर्दैवाने या समाजाचे नेतृत्व विभागलेले आहे. या समाजातील सारेच स्वत:ला सिंह समजतात आणि त्यामुळे इतर सर्वांनी माझी पाठराखण करावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. परिणामी संपूर्ण समाज विखुरलेला आहे आणि याची जाणीव असल्यामुळेच एवढ्या मोठ्या समाजातील दोघा शक्तिशाली नेत्यांना एकाच निवडणुकीत अशी वागणूक देण्याचे धारिष्ट्य केल्या जाते. पश्चिम महाराष्ट्रात अशी हिंमत दाखविता येत नाही; कारण तेथील कुणबी समाज शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एकवटला आहे. अर्थात त्यासाठी पवारांनीही तशी तपश्चर्या केली आहे. ते नेहमीच म्हणत असतात, ''मी पाच वर्षे काम करतो, म्हणून लोक निवडणुकीच्या काळात एक महिना माझे काम करतात. त्यांना निवडणुकीच्या काळात वैयक्तिकरित्या कधीच त्यांच्या मतदारसंघात ठाण मांडून बसावे लागत नाही; कारण त्यांचे काम बोलत असते. पश्चिम महाराष्ट्राने त्यांच्या नेतृत्वाखाली न भुतो, न भविष्यती असा विकास साधून घेतला आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातून कधीकाळीच्या माळरानांवर त्यांनी विकासाची नंदनवने फुलविली आहेत. त्यामुळे त्यांचा असा दबदबा निर्माण झाला आहे, की ते कोणाचेही राजकीय आयुष्य घडवूही शकतात अन् बिघडवूही शकतात. त्या दबदब्यामुळे दिल्लीश्वरांना त्यांच्या मर्जीशिवाय पश्चिम महाराष्ट्रात एखाद्याचा 'नाना पटोले' किंवा 'उत्तमराव पाटील' करता येत नाही. विदर्भात असे जाणीवपूर्वक होऊ दिल्या गेले नाही; कारण पश्चिम महाराष्ट्रात एक शरद पवार निर्माण होताबरोबर दिल्लीश्वरांची त्या भागात मर्जी चालेनासी झाली. हे त्या भागात प्रथमच घडले असे नाही. साडेतीनशे वर्षांपूर्वी त्याच भागात छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला अन् प्रथम विजापूरकरांची व नंतर दिल्लीश्वरांची मर्जी चालेनासी झाली. शिवाजी महाराजांपूर्वी त्या भागातील कुणबी समाजही सध्याच्या विदर्भातील कुणबी समाजाप्रमाणेच विखुरलेला होता. कोणी दिल्लीपतीच्या, कोणी विजापूरकरांच्या तर कोणी अहमदनगरकरांच्या चरणी निष्ठा वाहिलेल्या होत्या. त्यांच्या मनगटातील जोर अन् तळपत्या समशेरींच्या बळावर मोगल, आदिलशहा, निजामशहा आपापले बळ, प्रदेश, संपत्ती वाढवित होते आणि वेळ पडल्यास त्यांनाच हत्तीच्या पायी देत होते. जेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना परक्यांऐवजी स्वकीयांशी एकनिष्ठ राहायला शिकवले तेव्हा त्यांनी त्याकाळी कोणी स्वप्रातही विचार केला नसेल, असे हिंदवी स्वराज्याचे स्वप्र साकारले. विदर्भातील कुणबी समाज या इतिहासापासून आता तरी काही धडा घेणार आहे काय? आता तरी थोडे आत्मचिंतन करणार आहे काय?

No comments:

Post a Comment