Sunday, November 30, 2008
गृह मंत्रालायाची लक्तरे वेशीवर
स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वाधिक भयानक आणि सर्वाधिक सुसूत्रपणे आखलेला, राबविलेला हल्ला म्हणून अतिरेक्यांच्या मुंबईवरील हल्ल्याचे वर्णन करता येईल. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळे काही त्या अतिरेक्यांनी आखलेल्या योजनेबरहुकूम घडत होते. अर्थात, मुंबईत घुसलेले सगळेच अतिरेकी एकतर मारले जातील किंवा पकडले जातील. परंतु हा त्यांचा पराभव म्हणता येणार नाही. या युद्घाचा त्यांच्या लेखी हाच शेवट होता. मुंबईवर हल्ला करून, प्रचंड विध्वंस करून परत पाकिस्तानला पळून जाण्याचा बेत त्यांनी नक्कीच आखला नव्हता. त्यांना मरायचेच होते आणि मरण्यापूर्वी प्रचंड विध्वंस करायचा होता, दहशत निर्माण करायची होती आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे आम्ही योजना आखली तर दहा लाखाचे खडे सैन्य पदरी बाळगणारा हा विशालकाय देश आमच्यासाराख्या पाच-पंचवीस लढवय्यांसमोर कसा विकलांग होतो, हा संदेश जगाला द्यायचा होता. भारताविरुद्घ आतंकवादी युद्घ पुकारलेल्या संघटनांचे आत्मबल त्यांना उंचवायचे होते आणि त्यांच्या या हेतूत ते पूर्णत: सफल झाले. आमच्यासाठी समाधानाची बाब एवढीच की, मृतांचा आकडा जो एरवी हजारावर जाऊ शकला असता तो पाचशेच्या आतच राहिला आणि तोदेखील लष्कराच्या कमांडोंनी आपल्या जिवाची बाजी लावून त्यांचा खात्मा केला म्हणून; परंतु या यशाने हुरळून जाण्याचे कारण नाही. हे अतिरेकी मारल्या गेले ते एवढ्याचसाठी की ते मरण्यासाठीच आले होते किंवा त्यांच्या योजनेत पळून जाण्याचा समावेश नव्हता म्हणून. त्यामुळे मुंबईवर हल्ला करणा:या अतिरेक्यांचा खात्मा, ही बाब केवळ समाधानाची ठरते, गौरवाची नाही. या अतिरेक्यांच्या हल्ल्यात अनेक निरपराध नागरिक बळी गेले, पोलिस अधिका:यांसह काही शिपायांना वीरमरण आले, लष्कराचा एक मेजरदेखील शहीद झाला, या सगळ्याचे दु:ख तर आहेच; परंतु थेट पाकिस्तानातून आलेल्या या अतिरेक्यांनी एवढे मोठे `मिशन' त्यांच्या दृष्टीने यशस्वी करून दाखविले, ही बाब त्यापेक्षा अधिक लाजिरवाणी आहे. काय करत होते आपले गृहमंत्रालय? नेहमीच कडक इस्त्रीच्या पोशाखात वावरणा:या शिवराज पाटलांना आपल्या गृहखात्याच्या चिंध्या झालेल्या कशा लक्षात आल्या नाही? की ते लक्षात येण्याइतका त्यांचा वकुबच नाही? मुंबईवर हल्ला करण्याचा कट पाकिस्तानात शिजतो, अतिरेकी मुंबईत येतात, इथे चार-सहा महिने वास्तव्य करतात, सगळ्या योजनेचा बारीकसारीक तपशील गोळा करतात, प्रचंड दारूगोळा व आधुनिक शस्त्रास्त्रे प्रचंड प्रमाणात आणतात, पंच तारांकित हॉटेलात खुलेआम निवास करतात, त्यांचे काही साथीदार ठरल्या योजनेनुसार जहाजातून भारतीय किना:यापर्यंत पोहोचतात, स्पीड बोटीचा वापर करीत किना:यावर येतात, बेधडक, बेछूट गोळीबार करीत लष्करी जवानांच्या थाटात आपापल्या `पोझिशन्स' घेतात आणि आमच्या गुप्तचर संस्थांना, आमच्या पोलिसांना खबरही लागत नाही. अतिरेक्यांची संख्या नेमकी किती आहे, त्यांच्याजवल शस्त्रसाठा व दारूगोळा किती? हेदेखील निश्चितपणे आम्हाला सांगता येत नाही. स्वतंत्र भारताच्या इतिहासात आपल्या गुप्तचर खात्याचा, स्कॉटलंड यार्डसोबत तुलना केल्या गेलेल्या आपल्या मुंबई पोलिस दलाचा इतका लाजिरवाणा पराभव कधीच झाला नाही. या हल्ल्यात तीन वरिष्ठ पोलिस अधिका:यांसह चौदा पोलिस जवानांचा बळी गेला. ते सगळेच हकनाक मारले गेले. एके ४७ पेक्षाही घातक अशा जर्मन बनावटीच्या अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या, हातबॉम्ब आणि इतर स्फोटकांचा मुबलक साठा जवळ बाळगणा:या अतिरेक्यांविरुद्घ हातात पिस्तूल आणि एक गोळी झाडल्यावर दुसरी झाडण्यापूर्वी लोड करायला पाच मिनिटे लागणा:या रायफली घेऊन लढण्यात कोणता शहाणपणा होता? सीएसटीसमोर अतिरेकी त्यांच्या अत्याधुनिक बंदुकातून बेछूट गोळीबार करीत असताना आपण कुठपर्यंत समोर जावे याची साधी माहितीही शहीद हेमंत करकरे आणि त्यां'यासोबतच्या लोकांना नव्हती. ते सरळ समोर गेले आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव झाला. प्रतिकाराचीही संधी मिळाली नाही. सेकंदात जगाच्या एका टोकावरची माहिती दुस:या टोकापर्यंत पोहोचविणा:या माहिती-तंत्रज्ञानाच्या या युगात आमच्या पोलिसांकडे अतिरेकी कुठून गोळीबार करीत आहेत ही माहिती नसावी आणि असली तरी ती आपल्या वरिष्ठांकडे पोहोचविण्याची सोय नसावी, यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते? एकविसाव्या शतकातले युद्घ सतराव्या शतकातल्या तयारीने लढायचे असेल तर करकरे, कामटे, साळसकरसारख्यांचे बळी जाणारच! आमच्या पोलिसांजवळ अत्याधुनिक शस्त्रे नाहीत, दळणवळणाची अत्याधुनिक साधने नाहीत, आपापसातला योग्य समन्वय नाही, अतिरेकी त्यांचीच जीप घेऊन पळतात इतके ते बेसावध असतात; या सगळ्याला जबाबदार या देशाचे आणि राज्याचे गृहखाते, पर्यायाने गृहमंत्री आहेत. शहीद झालेल्या पोलिसांच्या, लष्करी जवानांच्या मृत्यूला शिवराज पाटील, आर.आर. पाटीलच जबाबदार आहेत. हे सगळे जवान पाटलांच्या नाकर्तेपणाचे बळी ठरले. त्यामुळे जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज बाळगून या दोन्ही गृहमंत्र्यांनी ताबडतोब आपले पद रिक्त करावे. या पदाची यापेक्षा अधिक बेइज्जती आता लोक सहन करणार नाहीत. आर.आर. पाटलांच्या कारकिर्दीत राज्याच्या पोलिस खात्याची पार वाट लागली. पोलिसांचा धाक गुन्हेगारांना कमी आणि सामान्य लोकांनाच अधिक वाटायला लागला. हप्ते, खंडणीची साखळी वरून खालपर्यंत पोहोचल्याने गुन्हेगार पकडण्याचे `टार्गेट' भलेही पूर्ण होवो अथवा न होवो, वसुलीचे `टार्गेट' पूर्ण करण्याकडे पोलिसांचे लक्ष लागले. पोलिसांनी पोलिसांच्या इभ्रतीला शोभेल असे काम करायला हवे होते, परंतु त्यांनी आपली इभ्रतच घालवली. इकडे अतिरेकी दिवसाढवळ्या तुमच्या डोळ्यासमोरून तुमचे मुडदे पाडत जातात आणि तिकडे आमचे पोलिस वरली-मटक्याच्या अड्ड्यावर धाडी घाल, दारूच्या गुत्त्यावर धाडी घाल, हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वाराला पकड, सिगारेट ओढणा:यावर दंडात्मक कारवाई कर, उघड्यावर शौचविधी करणा:याला पकड असल्या कामात गुंतलेले असतात. पोलिस विभागाची एवढी अवनीती यापूर्वी महाराष्ट्रात कधी झाली नव्हती, ती आबांच्या काळात झाली. पोलिस तरी काय करतील? अतिरेकी पकडल्यावर मांडवली करता येत नाही ना? आणि त्या गंजलेल्या बंदुका, पिस्तुले घेऊन अतिरेक्यांशी काय लढणार? `वीरमरण' कुणी स्वत:वर ओढवून थोडीच घेत असते? डान्स बार बंद करण्यासाठी आपले होते नव्हते तेवढे वजन वापरणा:या आबांना आपले पोलिस दल अत्याधुनिक करण्याचे कधी सुचले नाही, गुप्तचर यंत्रणा कार्यक्षम करण्याकडे त्यांनी कधी लक्ष दिले नाही. या पाटलांचे असे तर त्या पाटलांना देशापेक्षा आपल्या कपड्यांचीच काळजी अधिक. इतकी अस्तिव शून्य अकार्यक्षम व्यक्ति भारतासारख्या विशालकाय देशाच्या गृहमंत्रिपदावर राहूच कशी शकते, हा प्रश्न अमेरिकन मुत्सद्यांना पडतो, परंतु आम्हाला त्याचे काहीच वाटत नाही. या गृहमंत्र्यांचा दरारा इतका की कालपर्यंत कुठेतरी बॉम्ब ठेवून पळून जाणारे अतिरेकी आता सर्रास उघड्यावर येऊन गोळीबार करू लागले, बॉम्बस्फोट घडवू लागले. भारतीय जवान कितीही शूर, धाडसी असले तरी त्यांचे नेते जोपर्यंत नेभळट आहेत तोपर्यंत आपल्याला कुणी अडवू शकत नाही, हा विश्वास अतिरेक्यांमध्ये दृढ करण्याचे श्रेय शिवराज पाटलांनाच जाते. त्यांच्या कारकिर्दीत अतिरेक्यांची प्रत्येक योजना सफल ठरली आणि प्रत्येक वेळी कडक शब्दात निषेध व्यक्त करण्यापलीकडे आम्ही काहीच करू शकलो नाही. भारताला गरीब लोकांचा श्रीमंत देश म्हटले जाते; परंतु मुंबईवरील अतिरेक्यांच्या यशस्वी हल्ल्यानंतर भारत हा नेभळट पुढा:यांचा लढवय्या देश म्हणूनही ओळखला जाईल याची लाज पाटलांना असण्याचे कारणच नाही. किती आमचे दुर्दैव!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment